आधी मतदान मग देवदर्शन...
By admin | Published: February 22, 2017 07:12 AM2017-02-22T07:12:45+5:302017-02-22T07:12:45+5:30
जुन्या काळचे माणसे कर्तव्यापेक्षाही देवावर विश्वास ठेवणारी असतात असे म्हटले
मुंबई : जुन्या काळचे माणसे कर्तव्यापेक्षाही देवावर विश्वास ठेवणारी असतात असे म्हटले जात असले तरी मुलुंडच्या ९५ वर्षांच्या आजींनी घरातल्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देत मंगळवारी मतदान केंद्र गाठले. मतदानामुळे सुट्टी मिळाल्याने मोरे कुटुंबियांनी देवदर्शनाला जाण्याचे ठरविले होते. मात्र मोरे आजींनी आधी मतदान मग देवदर्शन फतवा काढत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
मुलुंड पश्चिमेकडील डम्पिंग रोड परिसरात ९५ वर्षांच्या नादराबाई संपत मोरे या मुलगा, सुन, नातवंडासोबत राहतात. मतदान करा, तरुणांनी पुढे या अशा अनेक जाहिराती आता सोशल नेटवर्किंग साईट्स, टीव्हीवर झळकत असतात. तरीही स्वत:चे कर्तव्य बजावण्यासाठी अनेकजण आळस करतात. पण, लोकशाहीचे महत्त्व ओळखून आपल्या हक्कांविषयी बोलतो त्याचप्रमाणे कर्तव्य बजावणे आवश्यक असल्याचा एक आगळावेगळा धडा आज मोरे आजींनी मुलुंडमध्ये सर्वच मतदारांना दिला.
आजी वयोमानानुसार कंबरेत वाकल्या आहेत, त्यांना आधाराशिवाय चालता येत नाही. पण, तरीही काठीचा आधार घेत एकट्याच नाही तर कुटुंबाला आळस झटकून पुढे आल्या आहेत. मतदानाचा कर्तव्य बजावून मतदान केंद्रातून बाहेर येणाऱ्या आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि रुबाब दिसून आला. आजींशी संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या, गेली कित्येक वर्षे मी मतदानाचा न चुकता हक्क बजावते आहे. याचा मला अभिमान आहे. अनेकदा उमेदवार हे निवडणुका जवळ आल्यावरच आपल्याला दिसतात. उमेदवार कोणीही असला तरीही आपण आपले कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. तरुणांनी हे लक्षात घेतले पाहिजे. अनेकजण मतदाना दिवशी सुट्टी असल्यामुळे आराम करणे, बाहेर फिरायला जाण्याला पसंती देतात. हे चुकीचे आहे. यात सुधारणा करण्याची सुरुवात मी माझ्या घरातूनच केली आहे. (प्रतिनिधी)