Join us

पहिले प्राधान्य महाआघाडीचे सरकार पाच वर्षे चालविण्याचे; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 7:41 AM

पक्ष वाढविण्याचा प्रदेशाध्यक्षांना पूर्ण अधिकार

- अतुल कुलकर्णीमुंबई : महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग जाणीवपूर्वक केला गेला. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालविणे हे आमचे सगळ्यांचे पहिले प्राधान्य आहे. प्रत्येक प्रदेशाध्यक्षाला आपला पक्ष वाढावा, तो जास्तीत जास्त संख्येने पुढे यावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या भूमिकेकडे त्याच नजरेतून बघितले पाहिजे, त्यातून वेगळे अर्थ काढणे चुकीचे आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे त्यावर आपली भूमिका काय आहे? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, प्रत्येक प्रदेशाध्यक्ष आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे ते कामच आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून तसाच अर्थ अभिप्रेत आहे. पण निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही एकटेच स्वतंत्रपणे गेलो तर आम्हाला किती जागा मिळतील याचाही विचार केला पाहिजे.

आम्ही नागपूरला आघाडी केली. म्हणून तेथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतानाही आम्ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागा जिंकू शकलो. या जागा अनेक वर्षे भाजपकडे होत्या. तेथे आमची आघाडीच कामाला आली. त्यामुळे महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत ज्या ठिकाणी अशा पद्धतीची आघाडी करून भाजपला पराभूत करावे लागेल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.  आताही अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुका लढवताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखावी लागेल. आगामी निवडणुकीत जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे म्हटल्यास गैर ते काय?, असा सवालही त्यांनी केला.

विरोधात लढण्याची उदाहरणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढण्याची अनेक उदाहरणे आहेत. याचा अर्थ आमचे एकमेकांशी पटत नव्हते, असा निघत नाही. मंत्रिमंडळात आम्ही एकत्र निर्णय घेत असू.  - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री होण्यावर भाष्य करायचे नाही

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे?, असे विचारले असता चव्हाण यांनी यावर मला कोणतेही भाष्य करायचे नसल्याचे सांगितले. 

टॅग्स :पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडी