मुंबई : पावसाळ्यासाठी सज्ज असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा पहिल्याच पावसात वाहून गेला. दोन तासांत झालेल्या चार इंच पावसात हिंदमाता, परळ, धारावी आदी परिसर पाण्याखाली गेले. मोठी भरती, नीप टाइडची ढाल नसल्याने पाणी न तुंबलेल्या ठिकाणांचा दाखला देत महापालिकेने आपला बचाव केला आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांबरोबरच महापालिकेचाही कस लागणार आहे.हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवार मध्यरात्रीपासूच मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. शनिवारी सकाळी काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला. मात्र संध्याकाळपर्यंत पावसाची सरासरी मुंबई व उपनगरात २५ मि.मी. ते ७५ मि.मी. होती. हिंदमाता, धारावी, परळ टी.टी. परिसरात पावसाची शंभर मि.मी.पेक्षा जास्त नोंद झाली आहे. हिंदमाता परिसरात दरवर्षी हमखास पाणी तुंबते. यावर तोडगा काढण्यात येत आहे. मात्र या वर्षी महापालिका यंत्रणा हा दिलासा स्थानिकांना देऊ शकलेली नाही. हा परिसर वगळता साकीनाका, विक्रोळी, अंधेरी, सायन अशा काही सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यास जास्त वेळ लागला. मोठी भरती आणि मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईची तुंबापुरी होते, असा बचाव महापालिका करीत असते. गेल्या वर्षी २९ आॅगस्टला मुंबईत पाणी तुंबल्यानंतर नीप टाइडचा शोध महापालिकेने लावला. मात्र आज समुद्रात मोठी भरती आणि नीप टाइड नसताना पाणी तुंबल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.मुंबईकर धावलाएकमेकांच्या मदतीलामुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या धारा कोसळत असतानाच मध्य मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. माझगाव येथे ११९.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथे ९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दादर येथे ७१.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मालाड येथे ६९.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वरळी येथे ६४.४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ ४८.८०, चेंबूर ५३.४०, कुलाबा ३३.४०, अंधेरी २८.८०, चारकोप येथे २५.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्य मुंबईत पावसाची अधिक नोंद होत असतानाच येथील मुंबईकरांनी एकमेकांना मदत करण्यासाठी हात पुढे केले होते. रस्ते वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये; यासाठी तरुणाई काम करत होती. महत्त्वाचे म्हणजे पाण्यातून मार्ग काढत असलेल्या मुंबईकर प्रवाशांनाही तरुणाईकडून मदत केली जात होती. प्रत्येक संकटांवेळी एकमेकांच्या मदतीला धावून जाणारा मुंबईकर पहिल्याच पावसात एकमेकांच्या मदतीला धावून आला होता.
पहिल्याच पावसात महापालिकेची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 7:03 AM