मुंबई : मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्या दिवशीच मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे बुधवारी मुंबईतील रेल्वे वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली होती. पहाटेपासूनच जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत ठीकठिकाणी पाणी साचले होते. हार्बर रेल्वे मार्गावरील चुनाभट्टी, कुर्ला, टिळक नगर, चेंबूर येथील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले होते. यामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. सकाळपासूनच हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच मध्य रेल्वेवर सायन, माटुंगा कुर्ला यादरम्यान ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.
मुंबईत पावसाचा प्रकोप वाढल्याने रेल्वे वाहतूक हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान सुरू ठेवण्यात आली होती. तसेच मध्य रेल्वेवर ठाणे ते कर्जत दरम्यान सुरू ठेवण्यात आली होती. दरम्यान, बुधवारच्या पावसाचा लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरदेखील परिणाम झाला. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या पटना, लखनऊ, गोरखपूर, पाटलीपुत्र तसेच सीएसटीहून सुटणार्या असनसोल, गोरखपूर, भुवनेश्वर, हैदराबाद, हावडा, वाराणसी, शालिमार या दुपारी सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या. दरम्यान, बुधवारच्या पावसाचा पश्चिम रेल्वेवर कोणताही परिणाम झाला नाही.