Join us

आधी मुंबई विकास आराखड्यातील रस्ते शंभर टक्के बनवायला हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 1:24 AM

लापता सडक उपक्रम : वाहतुकीची समस्या साेडवण्यावरही भर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचे शांघाय किंवा सिंगापूर बनविण्याची भाषा केली जात असली तरी मुंबईच्या तीन विकास आराखड्यातील रस्ते कित्येक वर्षांनंतर अजूनही  बनविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा मुंबईच्या तीन विकास आराखड्यातील जे रस्ते बनविण्यात आलेले नाहीत ते बनविले तर नक्कीच मुंबईचे शांघाय किंवा सिंगापूर होईल, असा आशावाद मुंबईकर नागरिकांसह  सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील नद्या स्वच्छ व्हाव्यात यासाठी काम केलेल्या रिव्हर मार्च या लोकचळवळीने रोड मार्च ही चळवळ हाती घेतली आहे. या चळवळीअंतर्गत ‘लापता सडक’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमानुसार मुंबईचे जे तीन विकास आराखडे आहेत त्यातील रस्ते बनविण्यात यावेत या प्रमुख मुद्द्यावर जोड देण्यात येणार असल्याचे चळवळीचे कार्यकर्ते गोपाळ झवेरी यांनी सांगितले.मुंबईच्या विकास आराखड्यातील रस्त्यांवर आता काम केले जात आहे. दहिसर, मुलुंड, वाशी या चेकनाक्यांवर ज्या बस बाहेरून येत होत्या त्या तिथेच थांबून मुंबईच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यात येत आहे. याबाबत राज्य सरकारसोबत बोलणे सुरू असून प्राथमिक काम सुरू झाले आहे. यास इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब असे संबोधले जात आहे. १९६७, १९९१ आणि २०१४ या सालात मुंबईचे विकास आराखडे सादर झाले. या तिन्ही विकास आराखड्यांमध्ये जे रस्ते दाखविण्यात आले; ते अजूनही पूर्ण झाले नाहीत. ते पूर्ण झाले तर मुंबईची वाहतूक व्यवस्था बळकट होईल. त्यामुळे विकास आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यावर भर दिला जात आहे.मुंबईच्या झोपडपट्ट्या, वनविभागाच्या जमिनी, खासगी जमिनी अशी अनेक कारणे रस्ते अपूर्ण असण्यास आहेत. मात्र आता विकास आराखड्यातील रस्ते का बनले नाहीत? ते का होणे गरजेचे आहे यासाठी एक मॉडेल बनवले आहे. ते राज्य सरकार, मुंबई महापालिकेसमोर मांडले आहे. या माध्यमातून मुंबईची वाहतुकीची समस्या सोडविण्यावर भर दिला जात आहे.

दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यताn‘लापता सडक’ या उपक्रमांतर्गत जे रस्ते विकास आराखड्यात आहेत पण प्रत्यक्षात नाहीत अशा रस्त्यांचा शोध घेण्याचे काम केले जाईल. या माध्यमातून वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले जाईल. nदरम्यान हे रस्ते बनविण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता असून अधिकाधिक लोकांनी या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन रोड मार्चच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन लोकांना ‘रोड मार्च’ आणि ‘लापता सडक’ या उपक्रमांबद्दल माहिती देण्यात यावी यासाठी ७ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता एका ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. यासंदर्भातील याचिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन रिव्हर मार्चने केले आहे. याचिकेवरील स्वाक्षरीबाबत येथे दिलेला क्यू आर कोड स्कॅन करता येईल, असे मार्चच्या रिंपल सांचला यांनी सांगितले.