सुजात आंबेडकरांसाठी पहिल्याच रांगेत जागा, मुख्यमंत्र्यांमुळे सोफा सरकला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 06:05 PM2023-04-14T18:05:15+5:302023-04-14T18:06:51+5:30
मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमीवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही कार्यकर्त्यांप्रमाणेच सहकाऱ्यांसमवेत वागताना दिसतात. ठाण्याच्या बालेकिल्ल्यात वावरताना कधी ते हातगाड्यावर वडापाव खाताना दिसले, तर कधी नातवासाठी छोट्याशा किराणा दुकानातून खाऊ खेरदी करताना दिसले. कार्यकर्त्यांना चलता चलता ते भेटतात. त्यामुळेच, एकनाथ शिंदेंचा हा सहजपणा अनेकांना भावना. त्यातच, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चैत्यभूमीवरील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमीवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राहुल शेवाळे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आनंदराज आंबेडकर, सुजाता आंबेडकर आदी उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर घडलेला छोटासा प्रसंग आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेते आणि मंत्री महोदयांसाठी पहिल्या रांगेतील व्यासपीठ होतं. त्यावर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदय बसले होते. तर, मुख्यमंत्र्यांशेजारी बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर होते. तर, व्यासपीठावरील दुसऱ्या रांगेत बाबासाहेबांचे परपणतू म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर बसले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सुजात यांना आपल्या रांगेत येऊन बसण्याचे सांगितले. त्यावेळी, तिथे खुर्च्या किंवा आसनव्यवस्था नव्हती. मग, मुख्यमंत्र्यांनी खुर्ची आणण्यास सांगितले. त्यावेळी, मंत्री दीपक केसरकर यांनी स्वत: उठून सुजात यांना जागा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुजात यांनी विनम्रपणे त्यांना नकार दिला. त्यावेळी, खुर्ची आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोफा पलिकडे सरकावायला सांगतिला. त्यामुळे, सोफा सरकताच मुख्यमंत्र्यांच्या रांगेतच दीपक केसरकर यांच्याशेजारी सुजात आंबेडकर खुर्चीवर बसल्याचे दिसून आले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली आहे. मात्र, कुठलाही राजकीय अविर्भाव न ठेवता, मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कौटुंबिक वारसा असल्याने सुजात आंबेडकर यांना मानाचे स्थान दिले. त्यामुळे, त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.