Join us

आधी बनावट कागदपत्रावर वाहन कर्ज नंतर महागड्या गाड्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:08 AM

१९ गाड्या विविध राज्यांतून जप्त, गुन्हे शाखेची कारवाईआधी बनावट कागदपत्रांवर वाहन कर्ज नंतर महागड्या गाड्यांची विक्रीविविध राज्यांतून ...

१९ गाड्या विविध राज्यांतून जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

आधी बनावट कागदपत्रांवर वाहन कर्ज नंतर महागड्या गाड्यांची विक्री

विविध राज्यांतून १९ गाड्या जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँका, खासगी संस्थांकडून वाहन कर्ज घ्यायचे आणि त्यातून विकत घेतलेल्या महागड्या वाहनांची परस्पर विक्री करायची अशा प्रकारे आर्थिक गुन्हे करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात एकूण १९ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे आरोपी ‘अ‍ॅमेझॉन’वरून कोरी स्मार्ट कार्ड मागवून ती आरसी बूक वाटावीत अशा प्रकारे त्यावर छपाई करून घेत होते, अशीही धक्कादायक बाब तपासातून उघड झाली आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप मौर्य हा या टोळीचा मास्टरमाइंड असून, तो कर्ज मिळवून देणारा दलाल आहे. त्याच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी आयसीआयसीआय, ॲक्सिस, पंजाब अ‍ॅण्ड नॅशनल, स्टेट बँक आणि दोन खासगी वित्त संस्थांना बनावट कागदपत्रे सादर करून गाड्या विकत घेतल्या. पुढे हीच वाहने कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये कमी किमतींना विकली किंवा गहाण ठेवल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

यात मौर्य हाच बनावट कागदपत्रे तयार करीत होता. तर त्याचे अन्य साथीदार यामार्फत कर्ज मिळवून पुढील जबाबदारी बजावत होते. गेल्या दोन वर्षांत या टोळीने बँकांबरोबर सामान्य नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे.

* साथीदार हाेता बँकेत नोकरीला

आराेपींचा एक साथीदार पूर्वी बँकेत नोकरी करीत होता. त्यामुळे कर्ज देताना बँक, वित्त संस्था कशा प्रकारे कागदपत्रांची पडताळणी करतात, हे त्याला माहीत हाेते. त्यानुसार तो त्याच्याकडे कर्जासाठी येणाऱ्या कागदपत्रांमध्येच फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार करीत होता. यात काही बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

....................