Join us

आधी अर्जांची छाननी, मगच लॉटरी; म्हाडाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 1:10 AM

गिरणी कामगारांच्या घरांसाठी आधी म्हाडाकडून लॉटरी काढली जायची आणि त्यानंतर विजेत्या अर्जदाराच्या अर्जांची छाननी करण्यात येत असे

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांसाठी आधी म्हाडाकडून लॉटरी काढली जायची आणि त्यानंतर विजेत्या अर्जदाराच्या अर्जांची छाननी करण्यात येत असे. मात्र, त्यामुळे लॉटरीत नाव आल्यानंतर, अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास त्याचा फटका अर्ज करणाऱ्या गिरणी कामगारांना पडत असे, पण आता यापुढे अर्जाची व्यवस्थित छाननी करून, अर्जात काही त्रुटी असतील, तर त्या दुरुस्त करून त्यानंतरच लॉटरी काढण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना आता कोणत्याही अडचणीशिवाय आपली हक्काची घरे मिळण्यास मदत होणार आहे.गिरणी कामगारांच्या या समस्येबाबत म्हाडाच्या मुख्यालयात नुकतीच गिरणी कामगार नेते आणि म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाºयांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. गिरणी कामगार नेत्यांनी मांडलेल्या माहितीनुसार, अर्जदार गिरणी कामगारांकडून बारीकसारीक चुका होत होत्या. नाव, पत्ता, गिरणीचे नाव, क्रमांक चुकल्यामुळे, तसेच एकपेक्षा जास्त अर्ज भरल्यामुळे लॉटरीमध्ये विजेते ठरूनही अर्जाच्या छाननीत ते बाद ठरत असत. त्यामुळे विजेते असूनही घर नाही, अशी परिस्थिती या कामगारांवर येत होती, तसेच म्हाडाकडूनही अनेक बाबतीत घोळ झाल्याचे गिरणी कामगार परिषदेच्या नेत्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या निदर्शनास आणले.एकाहून अधिक अर्ज भरणाºयांनाही लॉटरीत सहभागी केले जाते, तसेच जर दोन घरे लागली, तर एक घर गिरणी कामगाराला म्हाडाला परत करावे लागते, असा नियम असूनही एकाच कुटुंबातील दोन जणांना घर दिल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत, अशी माहिती गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘आधी अर्जाची छाननी करा आणि मगच लॉटरी काढा,’ हे आम्ही वारंवार सरकार आणि म्हाडाला सांगत आलो आहोत, पण दोघांनीही या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजास्तव गिरणी कामगारांच्या हितासाठी आम्हाला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण गिरणी कामगारांच्या घरांचे प्रश्न सोडविणाºया मॉनिटरिंग कमिटीकडे सुपुर्द करण्यात आले होते. त्यानुसार, जुलै, २०१७ मध्ये ‘आधी छाननी, मग लॉटरी’ असा आदेश कमिटीकडून म्हाडाला देण्यात आला होता. मात्र, म्हाडा याकडे दुर्लक्ष करत होती, असा आरोप दत्ता इस्वलकर यांनी केला.‘त्या’ अर्जांची पुन्हा होणार छाननीम्हाडाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार बॉम्बे डाइंग टेक्सटाईल, स्प्रिंग मिल, श्रीनीवास मिल या मिलमधील गिरणी कामगारांच्या अर्जांची पुन्हा एकदा विस्तृत छाननी करण्यात येणार आहे. ही छाननी करून अर्जांतील चुका दुरुस्त करून लवकरच गिरणी कामगारांच्या घरांसाठी लॉटरी जाहीर होणार आहे, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :म्हाडाघर