Join us

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी पहिली निवड यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 7:29 AM

एमबीबीएसच्या ६,६७४, बीडीएसच्या २,५१८ जागांवर विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : राज्यातील सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित, अल्पसंख्याक संस्थांमधील एमबीबीएस, बीडीएस सह नर्सिंग आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी निवड यादी सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या फेरीतील निवड यादीमध्ये एमबीबीएसच्या ६ हजार ६७४, तर बीडीएस प्रवेशासाठी २ हजार ५१८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी २९ ऑक्टोबरपासून ते ४ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन सीईटी सेलमार्फत करण्यात आले आहे. 

राज्यातील सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित, अल्पसंख्याक संस्थामधील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. याच प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीनंतरचा पुढील भाग म्हणून सीईटी सेलकडून २८ ऑक्टोबर रोजी रात्री पहिल्या फेरीसाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

यंदा एमबीबीएस प्रवेशासाठी राज्यात एकूण ७ हजार ६२० जागा उपलब्ध आहेत. यामधील ४ हजार ७५० जागा या शासकीय, तर २ हजार ८७० जागा या खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. बीडीएससाठी राज्यात एकूण २ हजार ७२६ जागा उपलब्ध आहेत. यामधील शासकीय दंत महाविद्यालयात केवळ ३२६, तर खासगी महाविद्यालयांत २ हजार ४०० जागा आहेत. यामधील पहिल्या फेरीत एमबीबीएसच्या ६ हजार ६७४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, बीडीएस प्रवेशासाठी २ हजार ५१८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

सावधानता बाळगा 

विद्यार्थ्यांनो, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज भरणे, नोंदणी शुल्क भरणे ही प्रक्रिया तुम्ही, एजंट किंवा सायबर कॅफेमार्फत करत असाल तर सावध रहा. संबंधित एजंट किंवा सायबर कॅफेतील व्यक्ती ऑनलाइन अर्ज भरण्यास किंवा शुल्क भरण्यास अयशस्वी झाल्यास आणि वेळेत अर्ज भरणे, शुल्क भरणे शक्य न झाल्यास त्यासाठी विद्यार्थी जबाबदार असेल. अशा विद्यार्थ्यांनी संबंधित वेळ मर्यादा संपल्यानंतर विनंती केली, तरीही त्याची दखल घेतली जाणार नाही, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :वैद्यकीयमहाराष्ट्र