आधी विक्रेत्यांकडून बिल मागा, मगच खाद्यपदार्थ विकत घ्या - पश्चिम रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:09 AM2019-07-22T03:09:31+5:302019-07-22T03:09:44+5:30
रेल्वेची ‘नो बिल, नो पेमेंट’ मोहीम : पहिल्याच दिवशी ५० हजार बिलांची नोंद
मुंबई : ‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रमांतर्गत स्टॉलधारकांकडून पहिल्याच दिवशी ५० हजार बिले प्रवाशांना देण्याचा विक्रम पश्चिम रेल्वेने केला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई, भावनगर, राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, रतलाम या सहा विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. ९ जुलै रोजी सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत ५ लाख ८० हजार बिलांची नोंद झाली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर ९ जुलैपासून ‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रम सुरू करण्यात आला. यामुळे मेल, एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थ विक्रेते आणि स्थानकांवरील स्टॉलधारकांवर वचक बसला आहे. खाद्यपदार्थाचे बिल मिळत असल्यामुळे प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारची जादाची रक्कम वसूल करता येत नाही. जर एखाद्या विक्रेत्याने बिल दिले नाही, तर ग्राहकांनी खाद्यपदार्थ मोफत घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. १६ जुलै रोजी ८० हजार ५०० बिले प्रवाशांना देण्यात आली. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण ५ लाख ८० हजार बिले प्रवाशांना देण्यात यश आल्याचे मत रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
स्टॉलबाहेर पाटी लावणे बंधनकारक
प्रत्येक रेल्वे स्थानकावरील स्टॉलधारकाने स्टॉलवर ‘नो बिल, नो पेमेंट’ अशी पाटी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. विक्रेत्याने स्वत:हून बिल देणे आवश्यक आहे. बिल दिले नाही, तर प्रवाशांनी ते मागून घेतले पाहिजे. स्टॉलधारकाने बिल देण्यास नकार दिला, तर प्रवाशांनी मोफत खाद्यपदार्थ घेण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ खरेदी केल्याचा पुरावा प्रवाशांकडे असावा, यासाठी पश्चिम, मध्य रेल्वे मार्गावर ‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रम सुरू केला आहे. अपायकारक खाद्यपदार्थांबाबत किंवा जादा रक्कम आकारल्याबाबत प्रवाशांना बिलामुळे संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करणे शक्य झाले आहे.
‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रमांतर्गत एका दिवसात पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागात ६ हजार ६६२, वडोदरा विभागात ९ हजार ८२०, राजकोट विभागात १ हजार ९८०, भावनगर १ हजार ४४७, रतलाम विभागात १३ हजार १५० बिले प्रवाशांना देण्यात आली.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ९ जुलै रोजी २६ हजार ९८६ बिले, १६ जुलै रोजी ४९ हजार ६०८ बिले प्रवाशांना दिली. त्यामुळे या आठवड्यात बिलांच्या संख्येत ८३.८३ टक्के वृद्धी झाली आहे. या आधी केवळ ३० ते ३५ हजार बिले प्रवाशांना दिली जात होती.