मध्य रेल्वेची पहिली शिफ्ट बंद, तर पश्चिम रेल्वेची सुरू; रेल्वे प्रशासनाचा सावळा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:50 AM2024-01-22T09:50:28+5:302024-01-22T09:52:05+5:30
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीबाबत रेल्वे प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे.
मुंबई : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अर्ध्या दिवसाच्या सुटीबाबत रेल्वे प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. एकीकडे मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यातील पहिली शिफ्ट बंद करून कर्मचाऱ्यांना सुटी दिली तर पश्चिम रेल्वेने पहिल्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांना हजेरी लावण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
प्रभूरामाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा २२ जानेवारी रोजी दुपारी १२:२० वाजता होणार आहे. राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सर्वसामान्यांना अनुभवता यावा, यासाठी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुटी मोदी सरकारने जाहीर केली होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर करून २:३० नंतर कर्मचाऱ्यांना बोलावले आहे.
मध्य रेल्वे माटुंगा कारखान्यात पहिल्या (सकाळी ७ वाजताची) शिफ्टमधील कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. दुसऱ्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांना २:३० वाजता बोलवण्यात आले आहे, तर पश्चिम रेल्वेच्या लोअरपरळ कारखान्यात पहिल्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांना देखील २:३० ते २:३५ या वेळेत हजेरी लावण्यासाठी बोलावले आहे. काही कर्मचारी वसई, विरार, डहाणू आदी ठिकाणी राहत असल्याने केवळ हजेरीसाठी त्यांना यावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अर्ध्या दिवसाच्या सुट्टी देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा कारखान्यात पहिल्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे; पण पश्चिम रेल्वेच्या लोअरपरळ कारखान्यात कर्मचाऱ्यांना हजेरीसाठी १ ते १:३० तासांसाठी यावे लागणार आहे. विरार, डहाणू आदी ठिकाणी राहत असल्याने त्यांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने शिफ्ट बंद केली असताना पश्चिम रेल्वेने कर्मचाऱ्यांना बोलावणे अन्यायकारक आहे. -रवी जाधव, अध्यक्ष, पश्चिम रेल्वे, भारतीय कामगार सेना