Join us

आधी धक्का, नंतर चोरी..., दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 12:50 AM

गर्दीच्या ठिकाणी सावज दिसताच, सहा जणांनी त्याच्या आजूबाजूला घेराव घालायचा.

मुंबई : गर्दीच्या ठिकाणी सावज दिसताच, सहा जणांनी त्याच्या आजूबाजूला घेराव घालायचा. त्यात एकाने डोक्याला बॅग लावून तयारीत राहायचे. सहाही जणांनी धक्का देत, संधी मिळताच बॅग चोरून अन्य साथीदाराच्या हातात द्यायची. सावजाने आरडाओरडा करताच, त्याची दिशाभूल करत पसार व्हायचे. अशी टोळी सध्या मुंबईसह राज्यभरात सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती पायधुनी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. या टोळीतील दुकलीला पायधुनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.मेहमूद मोहम्मद यासिन अन्सारी (५०), रवींद्र वसंत पांचाळ (४५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी अन्सारी हा जोगेश्वरी, तर पांचाळ हा कल्याणचा रहिवासी आहे. पायधुनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीत चंद्रकांत अंधेरे हे व्यापारी बँकेतून पैसे घेऊन बिबिजान स्ट्रीट जंक्शन येथून जात होते. त्याच दरम्यान पांचाळ आणि अन्सारीच्या टोळीने त्यांना घेरले. त्यांना धक्का मारत, बग घेऊन पसार झाले. व्यापाऱ्याने मागे वळून पाहिले, तेव्हा डोक्याला बॅग लावून उभा असलेला माणूस दिला. त्याच दरम्यान अन्य साथीदाराने लक्ष विचलित करण्यासाठी ‘पिछे गया’ म्हणत धावण्यास सुरुवात केली. व्यापारीही मागोमाग येताच, साथीदाराने अन्य मार्गाने वळण घेत पळ काढला.तर डोक्याला बॅग लावून असलेला पैशांची बॅग घेऊन पसार झाला. यात ४ लाख ४० हजार रुपयांची चोरी झाली. व्यापाºयाच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला.पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लीलाधर पाटील, फडतरे आणि अंमलदार सोलकर, दळवी, माने, सूर्यवंशी, ठाकूर यांनी तपास सुरू केला. तपासात, बुधवारी रात्री या टोळीतील दोघे जण घाटकोपर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच, तपास पथकाने सापळा रचला. दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत वरील घटनाक्रम उघड झाला.>चोरीचे पैसे बारबालांवर...मजामस्तीसाठी ही टोळी चोरी करते. चोरीच्या पैसे सहा जणांमध्ये वाटून घ्यायचे. दारुपार्टी नंतर बारबालांवर हे पैसे उडवत होते. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यानुसार, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली.