मुंबईत उभी राहणार पहिली सिग्नल शाळा; सांताक्रुझ चेंबूर जोड रस्त्याच्या उड्डाणपुलाखाली बेघर घेणार शिक्षण

By सीमा महांगडे | Published: February 14, 2024 03:47 AM2024-02-14T03:47:21+5:302024-02-14T03:47:21+5:30

मुंबईतील ही पहिली सिग्नल शाळा मुंबई पूर्व उपनगरामध्ये सांताक्रुझ चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल (चेंबूर) येथे साकारण्यात येणार आहे.

First Signal School to be set up in Mumbai for The homeless children under the flyover of Santacruz Chembur road | मुंबईत उभी राहणार पहिली सिग्नल शाळा; सांताक्रुझ चेंबूर जोड रस्त्याच्या उड्डाणपुलाखाली बेघर घेणार शिक्षण

मुंबईत उभी राहणार पहिली सिग्नल शाळा; सांताक्रुझ चेंबूर जोड रस्त्याच्या उड्डाणपुलाखाली बेघर घेणार शिक्षण

मुंबईत उदरनिर्वाहासाठी आणि आसऱ्यासाठी वाहतूक दिवे (सिग्नल) किंवा उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या मुलांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी म्हणून महानगरपालिकेने महत्त्वाचे व अभिनव पाऊल टाकले आहे. तब्बल १०० मुलांच्या शैक्षणिक व्यवस्थेची ‘सिग्नल शाळा’ महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांसाठी सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे. मुंबईतील ही पहिली सिग्नल शाळा मुंबई पूर्व उपनगरामध्ये सांताक्रुझ चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल (चेंबूर) येथे साकारण्यात येणार आहे.

राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील बेघर मुलांसाठी शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. त्या अनुषंगानेच नाविण्यपूर्ण अशा ‘सिग्नल शाळे’ची उभारणी करण्याचा पर्याय लोढा यांनी पालिकेला सुचवला होता. बेघर मुलांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षणाची सुविधा, बौद्धिक विकास आणि उज्वल भविष्यासाठीची संधी देणारी ‘सिग्नल शाळा’ उभारण्याच्या दृष्टीने पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. दरम्यान त्याप्रमाणे मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सदर प्रकल्पासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

सल्लागाराची नेमणूक
मुंबईत पूर्व उपनगरामध्ये बेघर मुलांसाठीच्या झालेल्या सर्वेक्षणानुसार चेंबूर येथील अमर महाल येथे महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने सिग्नल शाळेसाठी जागा शोधली. या शाळा उभारणीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेमध्ये अत्यावश्यक साधनसामुग्री, विज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणे आणि साधनसामुग्री, संगणक, प्रिंटर्स तसेच शाळेशी निगडित इतर बाबींचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.      

ठाण्याच्या धर्तीवर उपक्रम
स्थलांतरित किंवा बेघर कुटुंबीय आणि लहान मुले ही प्रसंगी उदरनिर्वाहासाठी वाहतूक दिवे (सिग्नल), उड्डाणपुलाखाली तसेच चौकाच्या ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करत असल्याचे आढळते. त्या अनुषंगाने समर्थ भारत व्यासपीठ स्वयंसेवी संस्थेने २०१८ मध्ये ठाणे येथील तीन हात नाका येथे सिग्नल शाळा सुरू केली होती. सिग्नल जवळच्या बेघर विद्यार्थ्यांना एकत्र आणून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ही संस्था चांगले काम करत आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण घेतानाच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षणही घेतले आहे. याच धर्तीवर मुंबईत पूर्व उपनगरात एक सिग्नल शाळा उभारण्यासाठी पालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेतला आहे.

साधारणपणे ६० ते १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची ही शाळा उभारण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. अधिकाधिक अद्ययावत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या शाळांच्या माध्यमातून करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसोबतच कुटुंबाच्या सामाजिक प्रगतीचा प्रयत्नही या पुढाकाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
डॉ. प्राची जांभेकर, संचालिका, नियोजन विभाग

Web Title: First Signal School to be set up in Mumbai for The homeless children under the flyover of Santacruz Chembur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.