लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांचे पहिले राज्यस्तरीय वन्यजीव संमेलन वन प्रशिक्षण संस्था शहापूर येथे २७ व २८ फेब्रुवारी असे दोन दिवस आयाेजित करण्यात आले आहे. यामध्ये वनपाल, वनरक्षक, वनमजुरांचा समावेश असेल.
वन्यजीवांबाबतच्या अभ्यासाचे सादरीकरण, कल्पना कर्मचारी सादर करतील. उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांपैकी २० कर्मचाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात येईल. संमेलन यूट्युब, फेसबुकद्वारे पाहता येईल. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्या संकल्पनेने, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होत आहे. सहभाग, सादरीकरण गुगल फॉर्मवर ५ फेब्रुवारीपर्यंत नोंदवता येईल. छायाचित्र प्रदर्शनासाठी छायाचित्र मेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचे जंगलाशी नाते असते. त्यांच्याकडे नोंदी असतात. नोंदींचे जतन होते. वनपाल, वनरक्षक, वनमजुरांनी वन्यजीव, पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरू, औषधी वनस्पती, फुले या विषयांवर नोंदी घेतल्या आहेत. त्याचा सर्वांना उपयाेग व्हावा म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
* राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध हाेणार
हा अभिनव प्रयोग असून वन विभागाचे कौतुक केले पाहिजे. उत्तम संकल्पना असून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना यातून बळ मिळेल. तळागाळात काम करणाऱ्या वनसेवकांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध होईल. शास्त्रीयदृष्ट्या वनसंवर्धन करण्याचा यातून नवा पायंडा पडेल.
- यादव तरटे पाटील (सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ)
-------------------------