मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आत्मनिर्भर भारतचा नारा पुन्हा दिला गेला मात्र देशातच भारताला आत्मनिर्भर करण्याच्या मराठी माणसाच्या प्रयत्नांना मात्र सुरुंग लावला जात आहे. ७४ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कॅप्टन अमोल यादव यांनी अथक परिश्रमाने बनवलेल्या पहिल्या वाहिल्या भारतीय बनावटीच्या विमानाच्या टेक ऑफ, लॅण्डिंग, टर्न, स्पीड ऑफ अशा चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. आता आणखी दोन चाचण्या शिल्लक असून त्या झाल्या की विमान सेवेत रुजू होऊ शकणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना प्रचंड आर्थिक चणचण भासत असून शासनाची कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी शासनाचे सहकार्यही अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
२००९ ला भारतीय बनावटीच्या या विमानाचा प्रवास अजूनही सुरूच आहे. २०१९ मध्ये चार वर्षांच्या कागदोपत्री खेळानंतर कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाची अधिकृत नोंदणी झाली. त्यानंतर पुन्हा त्याच्या चाचण्यां पूर्ण करण्यासाठी अमोल यादव याना २०२० ची वाट पहावी लागली आहे. यापुढील चाचण्या या विमान सर्किट पूर्ण करण्याची आणि एका विमानतळाहून दुसऱ्या विमानतळावर जाण्याची असणार आहे. मागील सरकारकडून आलेल्या कटू अनुभवानंतर अद्याप राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारशी त्यांचा संपर्क न झाल्याची माहिती अमोल यादव यांनी दिली. दरम्यान ते नवीन राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची आणि त्यांच्या या आत्मनिर्भर प्रयत्नाला मदतीचीच अपेक्षा करत आहेत.
वांद्रे- कुर्ला संकुलात २०१८ साली झालेल्या पहिल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणुकदारांच्या परिषदेत १९ फेब्रुवारी रोजी यादव आणि राज्य सरकार यांच्या सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा हा करार झाला. या करारानुसार पालघर इथे १९ आसनी विमाननिर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी राज्य सरकार यादव यांना जमीन उपलब्ध करून देणार होती. मात्र पुढे या करारनाम्याचे काहीच झाले नाही. अमोल यांच्या १९ आसनी विमानाचे इंजिन कॅनडामध्ये तयार आहेत. मात्र भारतात आणण्यासाठीही अमोल यांच्यासमोर सध्या आर्थिक अडचण आहे. इतकेच काय पुढच्या टप्प्यातील शेवटच्या चाचण्या कर्णयसाठीही त्यांना आर्थिक चणचण भासत असून शासनाकडून सहकार्याची अपेक्षा ते करत आहेत.
अडचणी आल्या तरी उद्दिष्ट कायम ठेवा : आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवायचे आहे हा विचार नवीन तरुणांनी आणि उद्योजकांनी मनात पक्का करावा असे आवाहन कॅप्टन अमोल यांनी स्वातंत्र्यदिनी केले. २००९ पासूनच्या त्यांच्या संघर्षात त्यांना खूप अडथळे आले, आजही त्यांचा प्रवास कठीण आहे. मात्र ते खचले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.