मुंबई/बीड - भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय कटुता कमी झाल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे. पंकजा मुंडेंनी एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडेंवर स्तुतीसुमने उधळत बहिण-भावाचं नात सांगितलं होतं. तर, धनंजय मुंडेंनीही पंकजा ताईंचं मोठ्या मनानं कौतुक केलं होतं. त्यानंतर, आता पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या बीडमधील एका संस्थेच्या सभासदपदी धनंजय मुंडेंची बनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे, बहिण-भावाच्या या राजकीय जवळीकतेची सध्या बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे.
संत भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या परंपरेतील 89 व्या नारळी सप्ताहाची सांगता भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी आ. धनंजय मुंडे यांनी संवाद साधला होता. यावेळी, भगवान गडाच्या भक्त परंपरेत पंकजाताई या गडाची एक पायरी तर मीही पायरीचा एक दगड आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्यातील संयमी व आपलेसे करणाऱ्या वक्तृत्वाची ओळख नव्याने करुन दिली. धनंजय मुंडे यांच्या आजच्या बोलण्यातून मनाचा मोठेपणा व वडीलकीची भावना देखील दिसून आली होती. त्यानंतर, आता दोनच दिवसांत एका एज्युकेशन संस्थेवर धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड झाली आहे.
पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची सभासद म्हणून बिनविरोध निवड झाली. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या 34 सभासदांसाठी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने धनंजय मुडेंची निवड बिनविरोध झाली आहे. पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या मनोमिलनानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंच्या संस्थेवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.
दरम्यान, संस्थेच्या इतर जागेवर तडजोडीचे राजकारण सर्वच पक्षांकडून केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. हितचिंतक गटातून पंकजा मुंडे यांच्या विरोधात एक अर्ज आला. तर, इतर 33 जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे चित्र दिसत आहे.