मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचा मध्यवर्ती बिंदु असलेल्या महानगराला, राजधानी मुंबईला उध्दव ठाकरे यांच्या रुपाने प्रथमच मुख्यमंत्रीपद लाभणार आहे. राज्याच्या साठ वर्षांच्या इतिहासात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अर्थात सीकेपी जातीमध्ये जन्मलेली व्यक्ती पहिल्यांदा राज्याच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळणार आहे.राजकारणावर छाप सोडणारे, ठाकरी शैलीबद्दल प्रसिध्द असलेले ठाकरे घराणे प्रथमच प्रत्यक्ष सत्तेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले आहे. मुंबईजवळील रायगड जिल्ह्याला अ.र.अंतुले (आंबेत )आणि मनोहर जोशी यांच्या रुपाने मुख्यमंत्रीपद लाभले होते. मुंबई मात्र मुख्यमंत्रीपदापासून वंचितच होती. १९६० पासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाकडेच मुख्यमंत्रीपद राहिले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयास नारायण राणे यांच्या रुपाने मुख्यमंत्रीपद लाभले आहे. उध्दव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे महसूल खात्यामध्ये नोकरीला होते. त्यानिमित्ताने या कुटुंबाचा मुक्काम राज्यात अमरावती, पुणे यासह अनेक ठिकाणी झाला. बाळासाहेबांच्या पुण्यातील जन्मानंतर ठाकरे कुटुंब मुंबईत स्थिरावले. २७ जुलै १९६० रोजी उध्दव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून अनेक चळवळींचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या मुंबईला मुख्यमंत्रीपदासाठी करावी लागलेली प्रदीर्घ प्रतीक्षा ठाकरे यांच्या रुपाने संपली आहे.
राजधानी मुंबईला ६० वर्षांमध्ये प्रथमच मुख्यमंत्रिपद लाभणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 5:39 AM