नायर रुग्णालयात पहिल्यांदा कॅडेव्हर डोनेशन

By Admin | Published: November 1, 2015 02:26 AM2015-11-01T02:26:26+5:302015-11-01T02:26:26+5:30

‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ या संदेशाने जनजागृती होत अवयवदानाचा टक्का वाढताना दिसत आहे. मेंदू मृत झाल्यास त्या व्यक्तींचे अवयवदान करून दुसऱ्यांना जीवनदान देता येते.

The first time Cheddar Donation at the Nayar Hospital | नायर रुग्णालयात पहिल्यांदा कॅडेव्हर डोनेशन

नायर रुग्णालयात पहिल्यांदा कॅडेव्हर डोनेशन

googlenewsNext

मुंबई : ‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ या संदेशाने जनजागृती होत अवयवदानाचा टक्का वाढताना दिसत आहे. मेंदू मृत झाल्यास त्या व्यक्तींचे अवयवदान करून दुसऱ्यांना जीवनदान देता येते. खासगी रुग्णालयात कॅडेव्हर डोनेशनचे प्रमाण चांगले आहे. पण पहिल्यांदाच महापालिकेच्या नायर रुग्णालयात झालेल्या कॅडेव्हर डोनेशनमुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे.
नायर रुग्णालयात एका १६ वर्षीय मुलीवर उपचार सुरू होते. तिच्या डोक्याला जबर मार बसला असून पक्षाघात झाला होता. त्यामुळे उपचारादरम्यान २९ आॅक्टोबर रोजी तिचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे निदान करण्यात आले. यानंतर तिच्या वडिलांना अवयवदानाविषयी सांगितले. तिच्या वडिलांनी किडनी दानासाठी परवानगी दिली, अशी माहिती मुंबईच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडून देण्यात आली.
१६ वर्षीय मुलीची एक किडनी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातील ३१ वर्षीय महिलेला दिली. तर दुसरी किडनी बॉम्बे रुग्णालयातील ४९ वर्षीय महिलेला देण्यात आली. या तरुणीमुळे दोन महिलांना जीवनदान मिळाले आहे. वर्षातील हे ३६ वे कॅडेव्हर डोनेशन आहे.
नायर रुग्णालयातील डॉ. कल्पना मेहता, डॉ. वंदना तांडेल, डॉ. भागवत आणि प्रत्यारोपण समन्वयक बी.एच. पाटील यांनी मिळून केलेल्या कामामुळे त्या मुलीचा मेंदू मृतावस्थेत गेला आहे, हे निदान करणे शक्य झाले. महापालिकेच्या रुग्णालयात मेंदू मृतावस्थेत असणाऱ्या रुग्णांचे निदान होत नाही. पण या डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे नायर रुग्णालयात पहिल्यांदाच कॅडेव्हर डोनेशन होऊ शकले, असे समितीचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The first time Cheddar Donation at the Nayar Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.