मुंबई : मुलींना खेळण्यासाठी मैदानात प्रवेश नाही, अशी विचारसरणी असलेल्या भागांत रविवारी मुली खुल्या मैदानात क्रिकेटचे सामने खेळल्या. लर्निंग कम्युनिटीतर्फे या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.लर्निंग कम्युनिटीसाठी आठ संस्था एकत्र येऊन काम करीत आहेत. मुली व महिलांपुढे निर्माण होणारे प्रश्न, त्यांना घातली जाणारी बंधने यावर या उपक्रमाद्वारे काम केले जाते. गोवंडी, वाशीनाका, चेंबूर या परिसरातील मैदाने ही मुलांसाठीच आहेत, असे वातावरण होते. तेथे मुलींना खेळू दिले जात नव्हते. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि मुलींना हक्काचे मैदान मिळवून देण्यासाठी लर्निंग कम्युनिटीने सार्वजनिक जागांवर सर्वांचा हक्क असा उपक्रम हाती घेतल्याचे सुषमा काळे यांनी सांगितले. सुषमा यांनी पुढे सांगितले, ‘मुलींना मैदानी खेळ खेळायला मिळावेत, म्हणून चार महिन्यांपूर्वी हा उपक्रम सुरू झाला. रविवारी ८ मुलींच्या टीमने क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता. गेल्या तीन महिन्यांपासून मुलींना प्रशिक्षण देण्यात येत होते. मुलींनी चांगला सराव केला होता. आज त्यामुळे मुली आत्मविश्वासाने खेळल्या.’ ‘सुरुवातीच्या काळात अनेक स्तरातून विरोध होत होता. मुले मैदानावर खेळायला देत नव्हती. मुलींच्या घरून विरोध होत होता, पण तीन महिन्यांनी चित्र बदलेले दिसले. आज मुलींचे पालक सामन्यांसाठी उपस्थित होते,’ असे रोहिणी कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मैदानात ‘त्या’ पहिल्यांदाच खेळल्या क्रिकेट
By admin | Published: April 24, 2017 2:42 AM