मुंबई : गेल्या आठवड्याभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी ५२५ दिवसांवरून शुक्रवारी ३९३ दिवसांवर आला आहे. मुंबईकरांसाठी ही धाेक्याची घंटा आहे. शुक्रवारी दिवसभरात गेल्या महिन्याभराच्या तुलनेत सर्वाधिक ८२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या ६,५७७ सक्रिय रुग्ण आहेत.कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने महापालिकेने १ फेब्रुवारीपासून मुंबईतील लाेकल सेवा ठरावीक वेळेत सर्वांसाठी सुरू केली. त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी वाढल्याने गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याचे चित्र आहे. १२ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५२५ दिवसांचा होता. मात्र एकाच आठवड्यात यात १३२ दिवसांची घट झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
मृत्यूचा आकडा नियंत्रणातरुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूच्या आकडा कमी राखण्यात पालिकेला यश आले आहे. शुक्रवारी ४४० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश होता. यापैकी चार रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, तर पाचही रुग्ण ६० वर्षांवरील आहेत. आतापर्यंत ११ हजार ४३५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत ३० लाख ९८ हजार ८९४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.