राज्यात पहिल्यांदा सहा पोलीस महासंचालक!
By Admin | Published: April 15, 2015 01:53 AM2015-04-15T01:53:45+5:302015-04-15T01:53:45+5:30
सतीश माथूर यांना विधी व तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक करण्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पोलीस महासंचालकांची सहाच्या सहा पदे भरली गेली आहेत.
अतुल कुलकर्णी - मुंबई
सतीश माथूर यांना विधी व तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक करण्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पोलीस महासंचालकांची सहाच्या सहा पदे भरली गेली आहेत. आघाडी सरकारने एक पद कायम रिकामे ठेवून वरिष्ठांमध्ये राजकारण केले होते. नेमके हेच सहावे घर भरून घेण्यात पोलीस महासंचालक संजीव दयाळ यशस्वी झाले आहेत. शिवाय हेमंत नगराळे, हिमांशू रॉय यांच्यासारख्या दयाळ गट न मानणाऱ्यांनादेखील बाजूला सारण्यात त्यांना यश आले आहे.
पोलीस महासंचालकांची सहा पदे तयार झाली असली तरी दयाळ आणि अरुप पटनायक सप्टेंबर २०१५मध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे डीजींची दोन पदे रिक्त होतील. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार प्रवीण दीक्षित आणि राकेश मारिया यांची सहापैकी दोन पदांवर वर्णी लागू शकते. त्यात सध्या अॅन्टीकरप्शनला असणारे प्रवीण दीक्षित यांचे नागपूर कनेक्शन पाहता सप्टेंबरमध्ये दयाळ यांच्या जागी त्यांचा नंबर लागण्याची शक्यता दाट आहे.
बदल्या करताना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाला नेमायचे याचाही मार्ग खुला केला गेला आहे. बदल करताना आयपीएस अधिकाऱ्यांच्या दोन वर्षांच्या मुदतीचा कायदा पाळला गेला नाही. अनेकांना जुन्या पदांवर वर्षही झालेले नसताना बदलले गेले आहे. हिमांशू रॉय त्यातलेच एक आहेत. मुंबई क्राइम ब्रँचमधील अनुभव लक्षात घेऊनच त्यांना एटीएसची जबाबदारी देण्यात आली होती. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना जायचे की नाही यावरून झालेला वाद रॉय यांना; तर एका ठेकेदाराच्या बिलाचे प्रकरण नगराळे यांना भोवल्याचे बोलले जात आहे. सदानंद दाते दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्या जागी अतुलचंद्र कुलकर्णी यांना नेमण्यात आले तेव्हा कुलकर्र्णींना क्राइम ब्रँचच्या कामाचा अनुभव नाही, त्यांनी तेथे कधीही काम केलेले नाही अशी कारणे मुख्यमंत्र्यांना सांगितली गेली. मुख्यमंत्री स्वत: कुलकर्र्णींशी बोलले. तुम्ही क्राइम ब्रँचमध्ये काम केले पाहिजे, असा आग्रह धरला आणि अनेक वर्षे साईड पोस्टिंगला असणारे कुलकर्णी क्राइम ब्रँचला आले.
फडणवीस यांना स्वत:च्या विश्वासातील माणसे महत्त्वाच्या जागी हवी आहेत. त्यामुळे येत्या काळात अतुलचंद्र कुलकर्णी मुंबईचे पोलीस आयुक्त झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सोमवारी करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये महावितरण, म्हाडा आणि सिडको या तीन ठिकाणी अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी देण्यात आले आहेत. त्यातही महावितरणला अजय मेहतांच्या जागी गेलेले ओ.पी. गुप्ता हे तेथे जात असलेल्या सूर्यप्रकाश गुप्ता यांच्यापेक्षा कितीतरी ज्युनियर आहेत. त्यामुळे तेथे ज्येष्ठतेचा मुद्दा निर्माण होणार आहे. शिवाय सिडको आणि म्हाडा या दोन जागी याआधी अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी दिले गेले नव्हते. त्यामुळे अतिवरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीने खर्च करण्यावरही दलामधील काही अधिकारी नाराज आहेत. प्रशांत बुरडे यांना एक वर्षाच्या आत पोस्टिंग देण्यासाठी अमिताभ गुप्ता यांना बाजूला करण्यात आले. ठरावीक कालावधी पूर्ण न होताच बदल्या होणार असतील तर कायद्याला अर्थ काय, अशी चर्चा आता वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये होत आहे.
हे आहेत सहा महासंचालक
संजीव दयाळ मुख्य महासंचालक
प्रवीण दीक्षित लाचलुचपत विभाग
जावेद अहमद होमगार्ड्स
अरुप पटनायक हाउसिंग
विजय कांबळे सिक्युरिटी कॉर्पोरेशन
सतीश माथूर विधी व तांत्रिक