पहिल्यांदाच वडील मुख्यमंत्री, मुलगा आमदार; उद्धव ठाकरे-आदित्य यांची जोडी विधानसभेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 05:21 AM2019-11-28T05:21:37+5:302019-11-28T05:22:02+5:30
वडील मुख्यमंत्री तर मुलगा आमदार, असे ऐतिहासिक चित्र राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.
मुंबई : वडील मुख्यमंत्री तर मुलगा आमदार, असे ऐतिहासिक चित्र राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना त्यांचे पुत्र आदित्य यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
आदित्य हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. उद्धव ठाकरे हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबई किंवा राज्यातील शिवसेनेचा कोणताही आमदार त्यांच्यासाठी
जागा रिकामी करून देईल पण विधानसभेची पोटनिवडणूक लढण्याऐवजी उद्धव हे विधान परिषदेवर जाणे पसंत करतात या बाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया आधी राज्यसभेच्या व आता लोकसभेच्या सदस्य आहेत. युती शासनात वर्षभर मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे यांचे पुत्र नितेश सध्या विधानसभेचे सदस्य आहेत तर राणे आज राज्यसभा सदस्य आहेत. शंकरराव चव्हाण-अशोक चव्हाण या पितापुत्रांच्या जोडीने मुख्यमंत्रिपद भूषविले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आज विधानसभेच्या सदस्य आहेत.
नातेवाइकांच्या काही जोड्या या नव्या विधिमंडळात दिसणार आहेत. अमित आणि धीरज देशमुख या दोन सख्ख्या भावांची जोडी प्रथमच विधानसभेत दिसणार आहे. ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार विधानसभेचे सदस्य आहेत.
ठाकूर पिता-पुत्र; हम साथ साथ है!
भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड हे विधान परिषदेचे तर त्यांचे पुत्र प्रताप हे विधानसभेचे सदस्य आहेत. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत हे विधान परिषदेचे तर कन्या आदिती विधानसभा सदस्य आहे.
बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षीतिज ठाकूर ही पिता-पुत्राची जोडी विधानसभेचे सदस्य आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे बबनदादा शिंदे व करमाळ्याचे आ. संजय (मामा) शिंदे हे दोन सख्खे भाऊ विधानसभेचे सदस्य आहेत.