हायकोर्ट न्यायाधीशाची प्रथमच मुलाखतीने निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 06:17 AM2018-05-01T06:17:49+5:302018-05-01T06:17:49+5:30

‘कॉलेजियम’ने न्यायाधीशांची निवड करण्याची पद्धत सुरु झाल्यापासून देशात उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड करण्यात आली आहे

First time the High Court judge gets interview | हायकोर्ट न्यायाधीशाची प्रथमच मुलाखतीने निवड

हायकोर्ट न्यायाधीशाची प्रथमच मुलाखतीने निवड

Next

मुंबई: ‘कॉलेजियम’ने न्यायाधीशांची निवड करण्याची पद्धत सुरु झाल्यापासून देशात उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड करण्यात आली आहे. अ‍ॅड. चेतन एस. कापडिया यांची मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणुकीची शिफारस करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने त्यांना प्रत्यक्ष बोलावून घेऊन काही गोष्टींची खातरजमा करून घेतली व त्यानंतरच त्यांची निवड केली.
खरे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी कापडिया यांच्या नावाची शिफारस गेल्या वर्षीच केली होती. १७ आॅक्टोबर रोजी झालेल्या ‘कॉलेजियम’च्या बैठकीत त्यांच्या नावावर विचारही झाला. मात्र उच्च न्यायालयातील एका दिवाणी दाव्यात (सूट क्र. ५१५/२०१५) पक्षकार म्हणून सहभागी होण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने खुलासा करून घेण्यासाठी मुख्य न्यायाधीशांकडून अहवाल मागवून तो येईपर्यंत त्यांच्या नावाचा निर्णय त्यावेळी पुढे ढकलण्यात आला होता.
त्यानंतर अ‍ॅड. कापडिया यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून खुलासा केला. मुख्य न्यायाधीशांनी आपल्या अहवालासोबत कापडिया यांचे पत्रही ‘कॉलेजियम’कडे पाठविले.
मुख्य न्यायाधीशांचा अहवाल, कापडिया यांचे पत्र आणि मुंबई उच्च न्यायालयाशी परिचित असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे मत या सर्वांच्या आधारे कापडिया यांची योग्यता ठरविण्याआधी ‘कॉलेजियम’ने त्यांना पाचारण करून त्यांच्याशीही संवाद साधला. एवढी सर्व खातरजमा केल्यानंतरच काही दिवसांपूर्वी ‘कॉलेजियम’ने कापडिया यांची निवड नक्की केली.

Web Title: First time the High Court judge gets interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.