पालिकेच्या इतिहासात प्रथमच अनधिकृत झोपड्यांवर कारवाईसाठी केला ड्रोनचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 08:32 PM2020-02-11T20:32:18+5:302020-02-11T20:33:17+5:30
आधुनिकतेची कास धरत मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच अनाधिकृत झोपड्यांवर ड्रोनचा वापर करून आज कारवाई करण्यात आली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - आधुनिकतेची कास धरत मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच अनाधिकृत झोपड्यांवर ड्रोनचा वापर करून आज कारवाई करण्यात आली.ड्रोनच्या वापरामुळे एकतर सदर कारवाईची छायाचित्रे मिळाली, तर दुसरीकडे झोपड्या तोडतांना जमावावर नियंत्रण देखिल ठेवता आले.यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी संपर्कासाठी मोबाईलचा वापर न करता वॉकीटॉकीचा वापर केला अशी माहिती आर मध्य विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त डॉ भाग्यश्री कापसे यांनी लोकमतला दिली.
बोरीवलीच्या आर मध्य कार्यालयाकडून दहिसर नदीच्या रूंदीकरणासाठी सुमारे १०० झोपड्यांवर डॉ भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शानाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.शासन धोरणानुसार सुमारे 100 झोपडीधारकांपैकी 40 पात्र झोपडीधारकांना
पर्यायी जागा देखिल दिली अशी माहिती पालिका प्रशासनाने लोकमतला दिली.
येथील अनाधिकृत झोपडपट्टीवर करण्यात आलेल्या निष्कासन कार्यवाहीत ३जेसीबी,२पोक्लेन यांच्यासह ५०कामगार या मोहिमेत सामिल झाले होते.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कस्तुरबा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेला यावेळी मोलाचे सहकार्य करण्यात आले.
दरम्यान, येथील 48 अपात्र झोपडपट्टीधारकांवर आणि 700 झोपडपट्टीधारक वापरत असलेल्या शौचालयावर पालिकेने कारवाई करू नये यासाठी विरोध करणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे,समाजसेवक दिलीप सुर्वे आणि शिवसिनिकांना पोलिसांनी कस्तुरबा पोलिसांनी अटक केली अशी माहिती भास्कर खुरसंगे यांनी लोकमतला दिली.