मुंबई : केंद्र शासनाच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पहिल्यांदाच मुंबईचाही समावेश करण्यात आला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबईत १९५ नवीन रुग्ण आढळून आले. त्यानुसार २५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर या कालावधीत मुंबईतील झोपडपट्टी, चाळी तसेच बांधकामांच्या ठिकाणी कुष्ठरोग शोधमोहीम पालिकेमार्फत राबविण्यात येणार आहे.या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी लवकर निदान आणि उपचार हे अत्यंत गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार २०१५ रोजी कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची निवड केली होती. तर ५ सप्टेंबर २०१६ रोजी राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये घरोघरी ही मोहीम राबविण्यात आली. या वर्षी राज्यातील सर्वच जिल्ह्यांत ही मोहीम राबवणार असून, मुंबईत पाहिल्यांदाच ही मोहीम होणार आहे. या अंतर्गत एक स्त्री व एक पुरुष स्वयंसेवकाची चमू तयार करून घरोघरी सर्वेक्षण केले जाईल.४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यंग असलेल्या कुष्ठरुग्णांना दरमहा एक हजार पेन्शन देण्यात येते, तसेच पात्र अपंग कुष्ठरुग्णांना रेल्वे व बस प्रवास सवलत पुरविली जाते. ६० वर्षांवरील निराधार अपंग रुग्णांना पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो. एक कोटी ३७ लाख लोकसंख्या असलेल्या मुंबई जिल्ह्यात दर १० हजारी कुष्ठरोग प्रमाण ०.२२ इतके आहे. दरवर्षी प्रत्येक एक लाख लोकसंख्येत ३.१७ नवीन कुष्ठरोग्यांचे निदान होते.
मुंबईत पहिल्यांदाच कुष्ठरुग्ण शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:47 AM