यदु जोशी - मुंबईशिल्लक असलेला एफएसआय हा विकास हक्क हस्तांतरणाच्या (टीडीआर) स्वरूपात अन्यत्र वापरण्याची मुभा सिडकोच्या वतीने देण्यात आली असून, त्याचा फायदा हा नवी मुंबई विमानतळग्रस्तांना होणार आहे. सिडकोच्या धोरणात टीडीआरची तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. या प्रकल्पग्रस्तांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या २२.५० टक्के इतकी जमीन प्रकल्पग्रस्तांना विकसित करून देण्यात येणार आहे. या जमिनीवर त्यांना सरासरी २ इतका चटई निर्देशांक (एफएसआय) देण्यात आला आहे. मात्र विमानतळ परिसर असल्याने इमारतींच्या उंचीवर निर्बंध असतील. त्यामुळे आणि अनेक प्रकल्पग्रस्तांना मिळालेला हा एफएसआय उपयोगातच येणार नाही, अशी परिस्थिती होती. आता उंचीचे निर्बंध वा अन्य कारणांनी देय एफएसआय वापरता आला नाही, तर तो अन्यत्र वापरण्याची परवानगी देण्याचे अधिकार सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणारा निर्णय घेताना त्यांना मिळालेला एफएसआय त्यांच्या जमिनीवर वापरूनही शिल्लक राहिला असेल, तर तो टीडीआर म्हणून अन्यत्र वापरण्याची अनुमती दिली आहे. प्रकल्पग्रस्तांना तो स्वत: वापरायचा नसेल तर ते त्याची विक्री करून आर्थिक उत्पन्नही मिळवू शकतील. तथापि, दोन्हींबाबत हा टीडीआर नवी मुंबई विमानतळासोबत विकसित होणार असलेल्या पुष्पक नगरीमध्येच करता येणार आहे. प्रकल्पग्रस्ताला स्वत:ला टीडीआर वापरायचा असेल, तर त्याला तो मिळाल्यानंतर पाच वर्षांच्या आत वापरात आणावा लागेल. त्याला तो विकायचा असेल तर दोन वर्षांत निर्णय करावा लागेल. दोन्हींना मुदतवाढ देण्याचा अधिकार सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना असेल.
सिडकोकडून टीडीआरची पहिल्यांदाच तरतूद
By admin | Published: May 26, 2015 2:00 AM