Join us

दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्ण संख्या १० हजारांच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:08 AM

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांच्या खाली आहे. मार्च महिन्यानंतर राज्यात सोमवारी ८ हजार ...

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांच्या खाली आहे. मार्च महिन्यानंतर राज्यात सोमवारी ८ हजार १२९ रुग्ण आणि २०० मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ४७ हजार ३५४ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात १४ हजार ७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्के आहे. राज्यात ९ लाख ४९ हजार २५१ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर ५ हजार ९९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासलेल्या ३ कोटी ८२ लाख १५ हजार ४९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.४८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण उपचाराधीन

राज्यात पुण्यात सर्वाधिक रुग्ण उपचाराधीन असून, ही संख्या १९ हजार ४७ इतकी आहे. त्याखालोखाल, मुंबईत १८ हजार २०५, ठाणे १५ हजार ६८६, कोल्हापूर १५ हजार १५६ आणि सांगलीत १० हजार ७७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी दर सर्वाधिक

राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर सर्वाधिक १५.८५ टक्के एवढा आहे, तर कोल्हापूरपाठोपाठ रत्नागिरी १४.२, रायगड १३.३ आणि पुण्याचा पॉझिटीव्हिटी दर ११.११ टक्के आहे. सर्वात कमी पॉझिटिव्हिटी दर गोंदिया जिल्ह्याचा ०.८७ टक्के आहे.