मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या नियमित परीक्षेतील तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ चा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९५.७९ टक्के एवढा लागला आहे. सोबत बीएमएम सत्र ६ या परीक्षेचाही निकाल आज जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९६.११ टक्के एवढा लागला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने प्रथमतःच सत्र ६ सह नियमित मुख्य परीक्षेच्या सर्व निकालांच्या नमुना गुणपत्रिका गुण, ग्रेड व छायाचित्रासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ परीक्षेला ६४ हजार ७४७ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी ६४ हजार १८२ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते.निकालाच्या वेळी त्यातील एकूण ४९ हजार २९३ एवढे विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५३९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तर बीएमएम सत्र ६ च्या परीक्षेत एकूण ३ हजार ९५७ एवढे विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. एलएलबी सहाव्या सत्राचा निकाल ही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला असून तो ९६. ४२ %इतका लागला आहे. या परीक्षेला बसलेल्या ४ हजार ३९६ विद्यार्थ्यापैकी ३९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नमुना गुणपत्रिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांने आसन क्रमांक टाकल्यास त्यांना ही गुणपत्रिका छायाचित्रासह पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होणार आहे.मुंबई विद्यापीठाच्या सर्व नियमित आणि बॅकलॉग परीक्षांच्या निकालास सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने यशस्वी नियोजन केले आहे. महाविद्यालयांनी वेळेत पोर्टलवर गुण उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीतच विद्यापीठाने हे महत्वाचे निकाल जाहीर केले आहेत. इतरही सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
पहिल्यांदाच विद्यापीठाच्या नमुना गुणपत्रिका छायाचित्रासह संकेतस्थळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 2:21 AM