ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - आज १६ एप्रिल..१८५३ सालात आजच्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली ट्रेन धावली... तीन इंजीनं आणि वीस डब्यांच्या या गाडीनं हे अंतर ५८ मिनिटांत पूर्ण केलं..हे त्या काळचं एक मोठ्ठ आश्चर्य होतं..
३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव येथे पहिली कुदळ मारून रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. जवळजवळ४५ लाख रुपये खर्च करून मुंबई-कल्याण पर्यंतचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचे पूर्ण श्रेय लॉर्ड डलहौसीला दिले जाते ते चुकीचे आहे , कारण त्यासाठी फार मोठे कष्ट नानांनीच घेतले आहेत. वाद हे त्या काळीही होते.
१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या शुभदिनी मोठमोठे साहेब , नेटिव्ह उपस्थित होते. १८ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद ५०० लोकांनी लुटला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते.
नामदार यार्डली , जज्ज चार्लस् जकसन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती.
१६एप्रिल १८५३ ला दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला. तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे भासत होते. काळे पोषाख घातलेले इंजिनाच्या पोटात असलेले खलाशी , फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क चालू लागली.
लोक बोलू लागले की , पुराणकाळात आपण अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रजांचा राजा देवाचा अवतार , अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग , शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झालेच , पण गायी , बैल भेदरले आणि कुत्रे पिसाळल्यासारखे भुंकू लागले. एकीकडे लष्करी बँडही निनादत होता.
मुंबई ते ठाणे हे अंतर कापायला गाडीने तब्बल ५७ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्याजवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर , डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली , तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन ६.३०वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटे आगीची गाडी बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली. तर असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास कोणत्याही चमत्काराला दैवत्व बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले , ‘ चाक्या म्हसोबा’.
आज आपल्या लोहमार्गाची लांबी नऊलाख किलोमीटरच्या आसपास आहे. भारतात रेल्वेयुग अवतरून 163 वर्षे पूर्ण झाली. आज १२-१५ डब्यांच्या गाड्या आश्चर्य राहीलं नसलं तरी एके काळी 'सहा डब्यां'च्या गाडीचं कौतुक होंतं..
काही काळ मुंबईच्या उपनगरीय गाड्या सहा डब्यांच्या होत्या. तीच याद ताजी करण्यासाठी हा सहा डब्यांच्या गाडीचा फोटो..!!