Join us

या पावसाळ्यातला मुंबईत पहिला बळी; लेप्टोस्पायरोसिसमुळे तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 7:41 AM

गॅस्ट्रोही पसरतोय हातपाय

मुंबई : निम्मा जून महिना कोरडा गेल्यानंतर अखेरच्या आठवड्यात पावसाने मुंबईवर कृपावृष्टी केली. पावसाला सुरुवात होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात लेप्टोस्पायरोसिसमुळे एका ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सहव्याधी असलेल्या या रुग्णाला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २३ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान, महापालिकेने जूनमधील पावसाळी आजारांची आकडेवारी जाहीर केली असून त्यात गॅस्ट्रो अग्रक्रमांकावर आहे. दूषित पाण्यामुळे हा पोटाचा विकार होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे बाहेरचे, रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचा मोह टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. गॅस्ट्रोखालोखाल मलेरियाच्या रुग्णांची संख्या असून डासांमुळे होणारा हा आजार येत्या काळात आणखी बळावण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. 

पावसाची सुरवात झाल्यावर पहिल्या टप्प्यात गॅस्ट्रोचे आणि मलेरियाचे  रुग्ण अधिक प्रमाणात दिसतात. कारण दूषित पाणी शरीरात गेल्यामुळे हा आजार होतो. त्यामुळे त्यामुळे नागरिकांनी या काळात पाणी उकळून प्यावे. गरम पदार्थ खावेत. विशेष म्हणजे डॉक्टरांकडून वेळेत तपासणी करून घ्यावी. या आजारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. लक्षणांनुसार औषध दिल्यास काही दिवसात रुग्ण बरा होतो.  - डॉ. अविनाश सुपे, पोटविकारतज्ज्ञ, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

टॅग्स :आरोग्यमुंबई