लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेवरील विशेष ब्लॉकच्या चौथ्या दिवसाची सुरुवात सोमवारी झाली. सोमवार ते शुक्रवार दररोज लोकलच्या ३१६ फेऱ्या रद्द होणार असल्याने सोमवारी बोरिवली, अंधेरी, कांदिवली, दादर या स्थानकांवर सकाळच्या सत्रात तुफान गर्दी आढळून आली. अनेकांनी तर जीव धोक्यात घालून लोकल पकडण्याचे दिव्य पार पाडले. खार ते गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सोमवारपासून ३१६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी दररोजची लोकल पकडण्यासाठी प्रवासी स्थानकांवर आले. फलाटांवर लोकल रद्द होण्याची उद्घोषणा होत असतानाच गर्दीत मात्र भर पडत होती. अशातच विलंबाने आलेल्या लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाल्याचे चित्र बोरिवली, अंधेरी, कांदिवली या स्थानकांवर होते. रेल्वे स्थानकावर गर्दी व्यवस्थापनासाठी आरपीएफ, जीआरपीसोबत पश्चिम रेल्वेचे काही अधिकारीही सकाळ-सायंकाळ गर्दीच्या स्थानकांवर लक्ष ठेवणार आहेत.
वेळेआधीच प्रवास
मेल एक्स्प्रेस गाड्या पकडण्यासाठी जे प्रवासी एक तास आधी घर सोडतात. परंतु पश्चिम रेल्वेवरील रद्द लोकल आणि लेटमार्क यामुळे गाडी सुटू नये यासाठी प्रवाशांनी दीड तास आधी घर सोडले.
पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना त्रास होत आहे. स्थानिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. राज्य सरकार, मुंबई महापालिका, वसई विरार महापालिका यांच्याशी वाहतूक व्यवस्थेबाबत चर्चा करूनच ब्लॉकचे नियोजन केले आहे.- नीरज वर्मा, व्यवस्थापक, मुंबई विभाग (पश्चिम रेल्वे)
खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान सहाव्या मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या कामासाठी सोमवारी ३१६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु प्रवाशांसाठी ३१६ पैकी ६८ फेऱ्या पूर्ववत करून २४८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसेच मंगळवारी ३१६ पैकी ८३ फेऱ्या पूर्ववत करून २३३ फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
मेगाब्लॉकमुळे वर्क फ्रॉम होमची मुभा
पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचा नोकरदार आणि विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेकांना ऑफिसमध्ये लेट मार्क मिळत आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली आहे. काही कॉलेजांनी ऑनलाइन लेक्चर घेण्यास सुरुवात केली आहे. ब्रेनली फर्नांडिस या दररोज वसईवरून चर्चगेटला लोकलने प्रवास करतात. त्या एका कंपनीत काम करतात. मेगाब्लॉकमुळे शेकडो गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना गाडीत घुसणेही कठीण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेत आमच्या कंपनीने आम्हाला मेगा ब्लॉक दरम्यान वर्क फ्रॉम होमची मुभा दिल्याचे फर्नांडिस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विद्यार्थ्यांना झळ, म्हणून...
- मी दररोज गोरेगावहून चर्नीरोड येथील कॉलेजमध्ये जातो. मात्र, पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे शेकडो गाड्या रद्द झाल्या आहेत. परिणामी आम्हा विद्यार्थ्यांना झळ बसली आहे.
- आमच्या महाविद्यालयाने गर्दी, गोंधळ लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत आम्हाला ऑनलाइन क्लासची मुभा दिली आहे, असे केदार परब याने ‘लोकमत’ला सांगितले.