नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महिला प्रवाशांकरिता सहा रेल्वे स्थानकांवर खासगी कंपनीचे हायटेक महिला स्वच्छतागृह सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने काही महिन्यापूर्वी घेतला होता.त्यानुसार, गुरुवारपासून मुलुंड स्थानकावर स्वतंत्र वुमन्स पावडर रूम (वुलू) सुरु करण्यात आले आहे. या वुमन्स पावडर रूममध्ये एकाच छताखाली महिलांना सुरक्षेसह विविध सुविधा मिळणार आहेत.
उपनगरीय रेल्वे ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहीनी मानली जाते. दिवसाला ७५ लाख लोक उपनगरीय लोकलने प्रवास करतात. यामध्ये साधारण २० लाखापेक्षा जास्त महिला प्रवाशांची संख्या आहे.मात्र रेल्वे स्थानकावरील बहुतांश महिला स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट आहे. कित्येक स्थानकांवर नावालाच स्वच्छतागृह आहेत.पाणी, लाईट्स नसणे, दुर्गंधी ही नित्याचीच बाब आहे. महिला प्रवाशांच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. त्यातही महिलांकडून पैसे आकारले जातात. तसेच महिला स्वच्छतागृहांमध्ये अतिशय दुर्गंधी असल्या कारणांमुळे बहुतांश महिला प्रवासी स्वच्छतागृहांचा वापर करणे टाळतात किंवा अगदी इमर्जन्सीमध्येच याचा वापर करतात. महिला प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने खासगी कंपनीच्या मदतीने सहा रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक आणि महिला स्वच्छतागृह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
रेल्वे स्थानकावर खासगी वातानुकूलित सुसज्ज महिला स्वच्छतागृह 'वन टाईम युज'साठी अंदाजित पाच रुपये आकारले जाणार आहे. तर, तुम्हाला मासिक पास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भविष्यात अनेक स्थानकावर वूलू टॉयलेट सुरु होणार आहे. त्यामुळे एकाच पासवर महिलांना कोणत्याही स्थानकांत वूलू टॉयलेटच्या वापरत करता येणार आहे.मध्य रेल्वेमार्गावरील एलटीटी,घाटकोपर,कांजुरमार्ग,ठाणे,मानखुर्द आणि चेंबुर या आणखी सहा स्थानकात वुमन्स पावडर रुम सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने इतरही स्थानकांत महिला स्वच्छतागृहाची निर्मिती केली जाणार आहे.काय आहे वुलू ?
वूलु ही संकल्पना पाश्चिमात्य देशातील असून या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह ,सॅनिटरी पॅड्स,चहा-कॉफी, सिविंग किट,ब्युटी प्रोडक्ट्स,पाण्याच्या बॉटल्स,सॅनिटायझर,सुमधुर संगीत, चॉकलेट्स अशा उपलब्ध असतील.त्यासाठी महिलाना शुल्क भरावे लागणार आहे. तसेच सौदर्य प्रसाधन वस्तू सुद्धा मिळणार आहे.