लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील चेंबूर परिसरात प्रथमच झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. ७९ वर्षीय रुग्णामध्ये हा व्हायरस आढळून आला असून, त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, थॅलेसेमिया हे आजार आहेत. त्यांच्यावर २० वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांना काही दिवसांपूर्वी सौम्य ताप आल्याने त्यांच्या डॉक्टरांनी विषाणूसंबंधित चाचण्या केल्या होत्या. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल व्हायरल इन्स्टिट्यूटमध्ये पाठविण्यात आले होते. त्याचा निकाल आला असून, त्या चाचण्यांमध्ये झिका व्हायरस आढळून आला असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.
मुंबईत झिका व्हायरसचा आढळलेला हा पहिला रुग्ण आहे. या रुग्णाला १९ जुलैपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे होती आणि त्यांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. २ ऑगस्ट रोजी रुग्ण बरा होऊन घरी परतला होता. त्यावेळी त्यांच्या डॉक्टरांनी उपचाराचा भाग म्हणून काही चाचण्या केल्या होत्या. त्यातील काही चाचण्यांच्या तपासणीसाठी ते नमुने पुणे येथील व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये पाठविण्यात आले होते. झिका आजार हा झिका व्हायरसमुळे होणारा सौम्य आजार आहे. हा आजार संक्रमित एडिस डासांमुळे होतो. एडिस डास चिकुनगुनिया आणि डेंग्यू आजारांचाही प्रसार करतात. हा आजार विषाणूजन्य असला तरी कोविडसारखा वेगाने पसरत नाही.
महापालिकेतर्फे बाधित रुग्णाच्या घरचे सर्वेक्षण करण्यात आले असून, कोणताही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. इमारतीच्या पार्किंगमध्ये एडिस ब्रीडिंग आणि डास नियंत्रण उपाययोजना केल्या आहेत.
- झिका हा एक स्वयंमर्यादित आजार आहे. झिकाची लागण झालेल्या ८० टक्के व्यक्तींमध्ये लक्षणे नसतात.
- ताप, त्वचेवर पुरळ, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी अशी याची लक्षणे आहेत.
- या आजाराच्या चाचणीची सुविधा मुंबई महानगरपालिकेत केईएम रुग्णालयात आहेत.