‘बेस्ट’च्या भाडेवाढीचे संकट, तूट ८८० कोटींवर; कामगारांवर कपातीची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:51 AM2017-10-11T04:51:46+5:302017-10-11T04:52:01+5:30
बेस्ट उपक्रमाचा सन २०१८-२०१९चा ८८० कोटी ८८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांंना बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी सादर केला.
मुंबई : बेस्ट उपक्रमाचा सन २०१८-२०१९चा ८८० कोटी ८८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांंना बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी सादर केला. मुंबई महापालिकेने मदतीचा हात आखडता घेतल्याने, तूट भरून काढण्यासाठी बेस्टने पुन्हा प्रवाशांच्या खिशात हात घालण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे कर्मचारी कपातीची शिफारसही करण्यात आल्यामुळे कामगारांवर कपातीची टांगती तलवार आहे.
गेल्या वर्षभरात बेस्टची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने पालक संस्था असलेल्या मुंबई महापालिकेला मदतीचे साकडे घातले होते. महापालिकेच्या अटीनुसार बेस्ट उपक्रमाने बेस्ट बचावासाठी कृती आराखडा तयार केला. मात्र, कामगार संघटनांच्या तीव्र विरोधामुळे हा आराखडा अद्याप कागदावरच आहे. परिणामी, बेस्टची तूट आगामी आर्थिक वर्षात ८८० कोटींवर पोहोचणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर बस भाडेवाढीचे संकट आहे. मात्र, प्रवासी वर्गात घट होण्याच्या भीतीने चार किमीपर्यंत कोणतीही वाढ प्रस्तावित नाही. त्यानंतर, ६ ते ३० किलोमीटरपर्यंत १ ते १२ रुपये इतकी भाडेवाढ सुचविण्यात आली आहे.
कर्मचाºयांना फटका
भाडेवाढीबरोबरच कर्मचाºयांचे भत्ते रद्द करणे, महागाई भत्ता गोठविणे, मनुष्यबळात कपात, असेही अर्थसंकल्पात सुचवण्यात आले आहे. बेस्ट उपक्रमात ४४ हजार कामगार, कर्मचारी, अधिकारी आहेत. त्यांना याचा फटका बसेल.
यामुळे होईल
तूट कमी
बेस्ट उपक्रमाचा मोठा खर्च हा बस खरेदीवर होत असतो. मात्र, बस भाड्याने घेतल्यास यासाठी खर्च होणारी मोठी रक्कम वाचेल. त्याचबरोबर, बस भाडे व बस पासच्या दरांत वाढ, कामगार कपात, ८८० कोटींची तूट २२८ कोटी २१ लाख रुपयांनी कमी होईल, असा दावा महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी केला आहे.
गेल्या वर्षीचा
अर्थसंकल्प लटकला
बेस्ट उपक्रमाचा सन २०१७-२०१८च्या अर्थसंकल्पाला महापालिका महासभेची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. शिलकीचा अर्थसंकल्प दाखविण्याचा नियम असताना, हा अर्थसंकल्प तुटीचाच दाखवून महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेने हा अर्थसंकल्प बेस्टकडे परत पाठविला होता. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना, दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
उत्पन्न वाढीचे असे काही उपाय
चांगले उत्पन्न मिळवून देणाºया बस मार्गांवर बसगाड्या वाढविणे, पासदरात वाढ अशी शिफारस अर्थसंकल्पात आहे. २०१५ मध्येच बेस्टने दोनदा भाडेवाढ केली आहे. तरी बस भाडे हेच उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असल्याने, पुन्हा भाडे वाढ करण्याची शिफारस अर्थसंकल्पात आहे.