Join us

‘मासळी विक्रेत्यांचे कुलाबा, फोर्टमध्येच स्थलांतर’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 12:53 AM

क्रॉफर्ड मार्केट मंडईचा पुनर्विकास सुरू असल्याने, येथील मासळी विक्रेत्यांना ऐरोलीला स्थलांतरित करण्यात येणार आहे.

मुंबई : क्रॉफर्ड मार्केट मंडईचा पुनर्विकास सुरू असल्याने, येथील मासळी विक्रेत्यांना ऐरोलीला स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेच्या कितीही नोटीस आल्या तरी आपली जागा सोडायची नाही, असा दिलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी दिला. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांनीही आता मासेविक्रेत्यांच्या स्थलांतराला विरोध सुरू केला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेऊन मासेविक्रेत्यांचे स्थलांतर थांबविण्याची मागणी केली, तर भाजपनेही यात उडी घेत हा मुद्दा उचलून धरला आहे.महात्मा ज्योतिबा फुले मंडई म्हणजेच क्रॉफर्ड मार्केटचे नूतनीकरण सुरू आहे. येथील मासेविक्रेत्यांचे तीन वर्षांसाठी ऐरोलीत स्थलांतरण करण्यात येणार आहे. या प्रकरणी मासळी विक्रेत्यांनी राज ठाकरे यांची गुरुवारी भेट घेऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. मनसेनेही मासेविक्रेत्यांना पाठिंबा दर्शविताच शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मासेविक्रेत्यांचा विषय उचलून धरण्यास विलंब केल्यामुळे ‘मातोश्री’वर नाराजी पसरल्याचे समजते. त्यामुळे महापौरांनी शुक्रवारी दुपारी घाईघाईत पत्रकार परिषद बोलावून शिवसेना मासेविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील तीनशे मासेविक्रेत्यांचे स्थलांतर आधी ऐरोलीला करण्यात येणार होते. हे स्थलांतर तात्पुरते असले, तरी मासेविक्रेते धास्तावले आहेत. त्यानुसार, त्यांच्यापुढे कुलाबा येथील जागेचा पर्यायही ठेवण्यात आला होता. महापौरांनी आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन कुलाब्यातच जागा देण्याची विनंती केली. आयुक्तांनी ही विनंती मान्य केल्याचा दावा महापौरांनी केला आहे.