Join us

ऐरोली जकात नाका येथील मासळी मार्केटचे लवकरच होणार स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 3:49 PM

Fish market at Airoli : अनधिकृत मासे विक्रेत्यांवर  महानगरपालिकेच्या मदतीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिस उपायुक्तांनी व मुंबई महानगर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधान परिषद आमदार रमेश पाटील यांना दिले.

मुंबई- ऐरोली जकात नाका येथील मासळी बाजार हा तात्पुरत्या स्वरूपात काही दिवसांसाठी स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे  सर्व प्रशासनाला पत्रव्यवहार करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी हे मासळी मार्केट लवकरात लवकर हलवण्याची विनंती करतो. तसेच अनधिकृत मासे विक्रेत्यांवर  महानगरपालिकेच्या मदतीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिस उपायुक्तांनी व मुंबई महानगर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधान परिषद आमदार रमेश पाटील यांना दिले. ऐरोली जकात नाका येथील मासळी मार्केटला स्थानिकांचा विरोध या संदर्भात लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमतच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले.

ऐरोली जकात नाका येथे क्रॉफर्ड मार्केटच्या करण्यात आलेल्या स्थलांतराला विरोध करण्यासाठी अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष चेतन पाटील यांनी दि, 12 रोजी आंदोलन करण्याचे ठरवले होते. परंतू मुंबई झोन 7 चे पोलीस उपायुक्त यांनी आंदोलन स्थगित करून चर्चा करण्याचे आमंत्रण सर्व मच्छी विक्रेत्या महिलांना दिले होते. त्यानुसार काल मुलुंड येथील  पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात आमदार रमेश पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत नवी मुंबई, मुलुंड, ठाणे, भांडुप, नाहुर, कांजूरमार्ग येथील मच्छी विक्रेत्या महिलांनी आपल्या व्यथा पोलीस उपायुक्त व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडून सदरच्या ठिकाणी होत असलेला अनधिकृत मासे विक्रीचा व्यवसाय ताबडतोब बंद करावा अशी मागणी केली. तसेच क्रॉफर्ड मार्केटच्या  परवानाधारक मासळी विक्रेत्या महिलांचा व दि मुंबई फ्रेश फिश डीलर असोशियन यांचा ऐरोली येथे येण्यास विरोध असल्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.

यावेळी आमदार रमेश पाटील व ॲड. चेतन पाटील यांनी ऐरोली जकात नाका येथे क्रॉफर्ड मार्केटच्या झालेल्या स्थलांतरामुळे या परिसरातील व क्रॉफर्ड मार्केटमधील महिलांना होत असलेला त्रास संबंधित अधिकाऱ्यांना सांगून त्याठिकाणची सर्व परिस्थिती या बैठकीत सर्वांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे क्रॉफर्ड मार्केटमधील महिलांचा ऐरोली जकात नाका येथे येण्यास विरोध असून या ठिकाणी काही घुसखोर मासे विक्रेत्यांकडून हा अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचे सांगण्यात आले.  त्यामुळे पोलीस प्रशासनाने व मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या अनधिकृत मासे विक्री विरोधात कारवाई करावी व स्थानिक मच्छी विक्रेत्यांना  न्याय द्यावा अशी मागणी केली.

यावर पोलीस उपायुक्त यांनी सांगितले की, सदरचे मार्केट हे तात्पुरत्या स्वरूपात काही दिवसांसाठी स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मी सर्व प्रशासनाला पत्रव्यवहार करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी हे मासळी मार्केट लवकरात लवकर हलवण्याची विनंती करतो. तसेच अनधिकृत मासे विक्रेत्यांवर  महानगरपालिकेच्या मदतीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी देऊन मत्स्यव्यवसाय मंत्री व महानगरपालिकेच्या सुधार विभागाचे सह आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व महिलांच्या व्यथा त्यांच्या कानावर घातल्या व मुंबई महानगर पालिकेच्या सुधार विभागाच्या सह आयुक्तांना या सर्व मच्छिमारांशी चर्चा करण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करून सहआयुक्त यांनी चर्चेसाठी येण्यास सांगितले.

त्यानुसार महानगरपालिकेचे सहआयुक्त (सुधार) यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त (बाजार) यांनी सदरचे मार्केट तात्पुरते एक महिन्यांसाठी स्थलांतरीत केले असल्याचे सांगितले. तसेच हे मार्केट बॉम्बे पोर्ट ट्रस्ट च्या जागेवर स्थलांतरित करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. त्याठिकाणी मार्केट स्थलांतर करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू असून हे मार्केट ऐरोली जकात नाका येथे कायमस्वरूपी नसून ते तात्पुरते आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अनधिकृत व्यक्तींकडून मासे विक्रीचा व्यवसाय होत असेल तर महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करून होलसेल विक्रेत्यांना किरकोळ मासे विक्री करण्यास मनाई करण्यात येईल असे सांगितले. यावेळी पोलिस प्रशासनाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी त्याचप्रमाणे  विशाल पाटील, छाया ठाणेकर,  बळवंत  पवार,  सचिन पागधरे, मीनाक्षी  पाटील, सुरेखा कोळी व अनेक मासळी विक्रेते बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

टॅग्स :ऐरोलीमच्छीमारमुंबई