मुंबई : मत्स्य दुष्काळ व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे मच्छीमारी मोठी संकटातून बाहेर पडत आहे. नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा कोळी बांधवांचा मानस असतानाच दादर व शिवाजी मंडईमधून मासे विक्रेता महिलांना विस्थापित करण्याचे दुःखाचे सावट आहे. यंदाचा नारळी पौर्णिमा उत्सव कोळी समाजाच्या भावनांचा उद्रेक असल्याची भावना मुंबईतील विविध कोळीवाड्यांमध्ये दिसून येते.
वेसावा कोळीवाडा मासेमारीसाठी सर्वात मोठा आहे. कोळी समाजाच्या निरनिराळ्या उत्सवांचे जोरदार स्वागत या कोळीवाड्यात होत आहे. तरी नारळी पौर्णिमा उत्सवाचा नारळ समुद्रात अर्पण करताना आपण मुंबईचे मूळ भूमिपुत्र असूनही या राजकीय व्यवस्थेने आम्हास अस्तित्वहीन करण्याचे षडयंत्र आखले असल्याची खंत वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय यांनी लोकमतकडे बोलून दाखविली.
त्यामुळे हा नारळी पौर्णिमा उत्सव आम्ही या व्यवस्थेविरोधात आणि समाजात जागृती निर्माण करणाऱ्या घोषणा देत आम्ही महासागराकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------------------