बोरिवलीच्या आय.सी. कॉलनीत साकारले 'फिश पार्क', पर्यटनमंत्र्यांनी केलं उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:00 PM2022-03-05T23:00:11+5:302022-03-05T23:01:07+5:30
बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनी फिश पार्क उद्यानाचे उद्घाटन शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी करण्यात आले.
मुंबई - बोरिवली पश्चिमकडील आय सी कॉलनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून येथे फिश पार्क उद्यान साकारले आहे.या फिश पार्कचे नूतनीकरण करून त्यामध्ये आकर्षक रंगसंगती सादर करत सेल्फी पॉइंट, फिश टॅंक तसेच आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.
बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनी फिश पार्क उद्यानाचे उद्घाटन शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी करण्यात आले. त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी पेट पार्क या संकल्पनेचे देखील कौतुक करताना मुंबईतील प्रत्येक वॉर्डात उभारण्यात येतील असे सांगितले. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ.विनोद घोसाळकर यांच्या संकल्पनेतून व स्थानिक शिवसेनेच्या नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या प्रयत्नाने या फिश पार्कचे नुतनीकरण करण्यात आले आहे.
येथील प्रभाग क्रमांक १ हा नेहमीच विधायक कामात अग्रेसर असतो इथे आल्यावर नवनवीन पेट पार्क, फिश पार्क सारख्या संकल्पना दिसून येतात असे प्रशंसोद्गार मंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले. या उद्घाटन प्रसंगी डॉ. विनोद घोसाळकर, उपमहापौर अँड. सुहास वाडकर, विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, महिला संघटक सुजाता शिंगाडे, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, पालिका उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, आर उत्तर वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर महिला शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा,रिव्हर मार्चचे पदाधिकारी, उपस्थित होते.