Join us

छत्रपती शिवाजी महाराज मंडईत मासळी विक्रेत्यांना संध्याकाळी 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत मासे विक्रीस परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 11:41 AM

Mumbai News : महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मच्छी विक्रीची पर्यायी जागा तात्पुरत्या स्वरुपात दिल्याने मच्छिमारांनी पहिली लढाई जिंकल्याचे समाधान तांडेल यांनी व्यक्त केले.

मुंबई - क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई मोडकळीस आल्याने तात्काळ खाली करण्याचे आदेश दिले परंतु मासळी विक्रेत्या महिलांना पर्यायी जागेचे कोणतेच नियोजन नसल्याने अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान बृहन्मुंबई महानगर पालिकेला प्रतिज्ञापत्रावर म्हणणे सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले होते. 

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मासे विक्रेत्या कोळी महिलांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे याचिका दाखल केली असून त्या याचिकेवर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. लोकमत ऑनलाईन आणि लोकमतमध्ये मच्छिमारांची समस्या सातत्याने मांडली असल्याबद्धल तांडेल यांनी लोकमतचे आभार मानले. त्याच जागी संध्याकाळी चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत मासळी विक्री करण्यास परवानगी दिली असून लवकरच पत्राचे शेड काढून मच्छी विक्रीचा व्यवसाय चालू केला जाईल अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मच्छी विक्रीची पर्यायी जागा तात्पुरत्या स्वरुपात दिल्याने मच्छिमारांनी पहिली लढाई जिंकल्याचे समाधान तांडेल यांनी व्यक्त केले. परंतू जोपर्यंत परवानाधारक मच्छी विक्रेत्या महिलांना कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराज मंडईमध्ये जागा देण्यात येत नाही तोपर्यंत न्यायालयीन आणि आंदोलनात्मक लढाई सुरूच राहणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिज्ञापत्रात दिलेल्या आश्वासनामुळे आणि मच्छी विक्री करण्यासाठी दिलेल्या परवानगीमुळे मच्छिमारांनी समाधान व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :मुंबईमच्छीमार