मुंबई : लोकांच्या सोनसाखळ्या चोरून त्यातून मिळालेल्या रकमेतून मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन चोरांना मंगळवारी अटक करण्यात आली. दहिसर पोलिसांनी ही कारवाई केली. या दोघांच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आतिश साखरकर (२६) आणि विजय श्रीधर (२५) अशी अटक करण्यात आलेल्या या दोघा चोरांची नावे आहेत. साखरकर हा विरार तर श्रीधर नायगावचा राहणारा आहे. हे दोघे मोटारसायकलवरून महिला आणि वृद्धांना टार्गेट करायचे. चोरी केलेल्या सोनसाखळ्या विकून त्यांनी मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता, अशी माहिती दहिसर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिली. यातील श्रीधर हा नायगावमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला फोन करून कांदिवली येथीव शताब्दी रुग्णालयाजवळ बोलावून तेथे अटक केली. कांदिवलीतून अटक करण्यात आलेल्या साखरकरवर अशाच प्रकारचे १३ गुन्हे दाखल आहेत. या आरोपींच्या अटकेमुळे सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
चोरीच्या रकमेतून मासेविक्रीचा व्यवसाय
By admin | Published: March 18, 2016 1:28 AM