मुंबई : मगरींपासून सावधान; पाण्यात उतरू नका, असे फलक महापालिकेने लावूनदेखील नियम धाब्यावर बसवत पवई तलावात सररासपणे मासेमारी केली जात असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेने याकडे कानाडोळा केला असून, येथे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल प्राणिमित्र संघटनेकडून केला जात आहे.पवई तलावात मगर असून, मासेमारी करणाऱ्यांना धोका आहे. महत्त्वाचे म्हणजे येथील मगरींमुळे तलावात उतरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीचे फलकही तलाव परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र पालिकेचे नियम धाब्यावर बसवत येथे मासेमारी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास तलावातून मगर बाहेर आल्याची दृश्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. परंतु तरीही येथे शनिवार-रविवार मोठ्या प्रमाणात मासेमारी होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तलाव परिसरातील कठड्यालगतच्या गाळात उतरून मासेमारी केली जाते. अनेक जण टायरच्या मदतीने चक्क तलावात उतरून मासेमारी करतात; शिवाय येथे मासेमारीसाठी लागणारे साहित्यही अवैधरीत्या विकले जाते. दरम्यान, मगरींचा धोका असल्याचे फलक लावूनही नियम धाब्यावर बसवत मासेमारी केली जात असल्याने एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)