- मनोहर कुंभेजकर
मुंबई - वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांना कोस्टल रोडच्या बांधकामामुळे समुद्रात मासेमारीसाठी अडथळा निर्माण होऊ लागल्यामुळे गेल्या महिन्यापासून सुरू असलेला संघर्ष आता पोलीस यंत्रणांच्या मदतीने मुंबई महानगर पालिकेने आंदोलनकर्ते मच्छिमारांवर कारवाई करण्याचे संकेत दिसू लागले होते.
पालिकेच्या आदेशानुसार आज मध्यरात्री आणि सकाळी 10 च्या सुमारास बोटी आणून पुम्हा काम सुरू करण्याचा प्रयत्न येथील मच्छिमारांनी हाणून पाडले.वरळी कोळवाडा नाखवा मत्स्यव्यवसाय सहकारी सोसायटी लिमिटेड चे सेक्रेटरी नितेश पाटील आणि वरळी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीचे सचिव रॉयल पाटील यांनी लोकमतला ही माहिती दिली.
राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मध्यस्थीमुळे कोस्टल रोडचे काम कारवाई थांबवून त्यांनी सोमवार पर्यंत तोडगा काढण्याचे ग्वाही दिली अशी माहिती त्यांनी दिली.तसेच पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण या विषयावर बोलणार आहे, लवकरच त्यावर तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिले अशी माहिती नितेश पाटील आणि रॉयल पाटील यांनी दिली.
मुंबई महानगर पालिकेच्या सांगण्यावरून आज वरळी कोळीवाड्यात पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला होता. सगळ्या प्रकारचे दबाव तंत्र संपले असल्याकारणाने आता पोलीस बळाचा वापर करण्याची हिम्मत महानगर पालिके कडून होताना दिसत असल्याचे मत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी व्यक्त केले. आज झालेल्या या घडामोडीची दखल मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहर पालक मंत्री अस्लम शेख यांनी घेतली. त्यांच्या पुढाकाराने महानगरपलिके मार्फत होऊ घातलेल्या पोलिसांची अवैध कारवाई थांवण्यात आल्यामुळे मच्छिमारांच्या वतीने तांडेल यांनी मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले.