- मनोहर कुंभेजकर
मुंबई: ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीकरण्यास सुरुवात झाली. मात्र राज्यभर पाऊस, वादळ, आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे मासेमारी होऊ शकली नाही. यामुळे राज्यातील मच्छीमार आर्थिक दृष्ट्या खचला असून महिन्याभरात शासनाकडून भरपाई मिळाली नाही. त्यामुळे तीव्र आंदोलन छेडण्याचा ठोस इशारा कोळी महासंघाने दिला आहे.
कोळी महासंघाच्या सागरी जिल्हा प्रतिनिधींची बैठक नुकतीच आमदार रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी मच्छीमारांनी हा एकमुखी निर्णय घेतला. यावेळी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, मच्छीमार नेते अशोक अंभिरे, नगरसेविका रजनी केणी, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे उपाध्यक्ष मोरेश्वर पाटील , परशुराम मेहेर, राजश्री भानजी आणि जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.
राज्यातील मच्छिमारांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे 2100 कोटी नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन कोळी महासंघाच्या वतीने राज्यपालांना यापूर्वीच देण्यात आले होते. त्या अनुषंगाने शासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि मच्छीमारांना सानुग्रह मदत करावी, असा ठराव या वेळी करण्यात आला .
शासनाने मच्छीमारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मच्छीमारांचे मोठे सागरी आंदोलन करण्याचा इशारा रमेश पाटील यांनी यावेळी दिला. मच्छीमार गावांना, कोळीवाड्यांना भेटी देऊन मच्छिमार समाजाचे सांत्वन करण्यासाठी उद्यापासून राज्यातील सागरी किनारपट्टीचा दौरा करणार असल्याचे आमदार रमेश पाटील यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले.
याप्रसंगी कोळी महासंघाचे युवा अध्यक्ष चेतनभाई पाटील, मुंबई जिल्हा अध्यक्ष रोहिदास कोळी, पंकज बना, वसई अध्यक्ष विशाल कोळी ,पालघर जिल्ह्याचे प्रवीण दवणे ,रायगड जिल्ह्याचे ज्ञानेश्वर टिळेकर, रत्नागिरीचे नारायण उपरकर ,मालवणचे बापर्डेकर, राजेश मांगेला, अशोक पाटील, उल्हास वाटकरे, छाया ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.