मनोहर कुंभेजकर, मुंबईकेंद्र सरकारच्या नौकानयन मंत्रालयाच्या गेल्या १४ आॅगस्टच्या परिपत्रकाप्रमाणे सर्व मच्छीमार नौकांचे (२० मीटर लांबीच्या नौकांसहित) आॅनलाइन नोंदणीच्या कामाकरिता नोंदणी अधिकारी म्हणून साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मत्स्यव्यवसाय खात्याच्या दिरंगाईमुळे नव्या मच्छीमार नौकांच्या नोंदणीला ब्रेक लागल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. पूर्वी बोटीच्या व्हीआरसी (नोंदणीचे) काम हे राज्याचा बंदर विभाग करत असे. या आदेशामुळे राज्यातील राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेअंतर्गत (एनसीडीसी) ३० ते ३५ लाख रुपये कर्ज घेऊन नव्याने बांधण्यात आलेल्या बोटींच्या व्हीआरसी (नोंदणी)चे कामच गेल्या आॅगस्टपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे अनेक नव्या नौका, मृत व्यक्तीच्या नौका कुटुंबातील वारसदाराच्या नावे मच्छीमारी नौकांची नोंदणी करणे, आदी व्यवहार ठप्प झाले आहेत. या नौकांच्या नोंदणीअभावी डिझेल कोटादेखील मच्छीमारांना मिळत नाही. त्यामुळे अनेक नौका समुद्रकिनारी शाकारून (नांगरून) ठेवाव्या लागल्यामुळे नौका नोंदणीअभावी अनेक मच्छीमारांचा मासेमारी व्यवसाय ठप्प झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मत्स्य व्यवसाय खात्याने लवकर बोटींच्या नोंदणीचे काम सुरू करावे आणि गेली सात महिने नोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्या मच्छीमारांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँँग्रेसच्या मत्स्यविभागाचे राज्यप्रमुख रामदास संधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.या संदर्भात महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मुंबईचे मुख्य अधिकारी यांनी २५ नोव्हेंबर रोजी मत्स्यव्यवसाय आयुक्त यांना पत्राद्वारे कळविले आहे. या पत्रामुळे बंदर खात्याने मत्स्यनौका नोंदणीचे काम त्वरित थांबावे, असे आदेश दिले. संबंधित कागदपत्रांच्या छायाप्रती साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांना हस्तांतरित करावेत, असे आदेश प्रादेशिक बंदर अधिकारी, बांद्रा, मोरा, राजापुरी, रत्नागिरी, वेंगुर्ला यांना जोडलेल्या प्रतीत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य अधिकारी यांनी नमूद केले आहे. आमच्या बोटींची नौका नोंदणी कधी सुरू होणार असे विचारले असता, मत्स्यव्यवसाय खात्याच्या टोलवाटोलवीमुळे मच्छीमारांना हेलपाटे आणि आर्थिक भुर्दंड होत असल्याची तक्र ार रामदास संधे यांनी केली.
मच्छीमार नौका नोंदणीला ब्रेक
By admin | Published: January 30, 2015 1:38 AM