वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटीची जागा बचावसाठी कोळी महिला आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 04:28 AM2018-08-03T04:28:58+5:302018-08-03T06:56:19+5:30
वेसावा कोळीवाड्यातील कोळी महिला आपल्या पूर्वज व स्वातंत्र सैनिकांनी स्वत:चे दागिने, जमीन विकून समाज हितासाठी सहकारी संस्थेसाठी विकत घेतलेली जागा वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आल्या आणि नारीशक्तीची ताकद त्यांनी सर्व वेसावकरांना दाखवून दिली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : वेसावा कोळीवाड्यातील कोळी महिला आपल्या पूर्वज व स्वातंत्र सैनिकांनी स्वत:चे दागिने, जमीन विकून समाज हितासाठी सहकारी संस्थेसाठी विकत घेतलेली जागा वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आल्या आणि नारीशक्तीची ताकद त्यांनी सर्व वेसावकरांना दाखवून दिली. जोपर्यंत वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटीची येथील जागा बिल्डरला विकलेल्या जागेचा करारनामा रद्द केल्याचे संस्थेच्या सभासदांकडून लेखी लिहून दिले जात नाही आणि बिल्डरने लावलेले पत्रे काढले जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा येथील महिलांनी घेतला. काल(दि.2) सायंकाळी 6.30 वाजता सुरू झालेले आंदोलन आज पहाटे 4 च्या सुमारास अखेर संपले. येत्या दोन तीन दिवसात गावकऱ्यासोबत मिटिंग घेऊन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन या संस्थेच्या सभासदांकडून मिळाल्यावर अखेर आंदोलनकर्त्या कोळी महिला येथून हटल्या आणि आपल्या घरी परतल्या.
1947 साली अॅड. शांताराम वेसावकर, जनार्दन पाटील, रमेश रामले, नारायण पाटील, पांडुरंग रामले,गोविंद सिद्धे, हरीश्चंद्र घुस्ते, भालचंद्र तेरेकर,भालचंद्र भंडारी, गोपीनाथ कास्कर, रामचंद्र घारू या काही स्वातंत्र सैनिकांनी जीवाचे रान करून व स्वतःचे दागिने, मालमत्ता विकून या संस्थेची समाज हितासाठी स्थापना केली होती. येथील मोक्याची जागा बिल्डरला विकायला येथील नारी शक्तिचा विरोध आहे.
या सोसायटीच्या काही संचालक मंडळींनी 'वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेड' या वेसावा कोळी सहकारी संस्थेची असलेली जमीन गावातील सभासदांना विश्वासात न घेता परस्पर बिल्डरला विकायला काढली आणि विकासकासोबत करारनामा केला.
येथील कोळी समाजाचा भविष्याचा विचार न करता या विरोधात येथील कोळी महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत येथील सोसायटीच्या जागेची विक्री करायला कडाडून विरोध केला.
काल सायंकाळी 6.30 वाजता येथील जागृत देवस्थान हिंगळा देवीच्या देवळात वेसावे गावातील सुमारे महिला मोठ्या संख्येने एकत्र आल्या. त्यांनी देवीची आरती केली. मग हिंगळा देवी मंदिर ते वेसावे कोळीवाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मसान देवी मंदिरा पर्यंत अगदी पावसाने जोर धरला तरी जागरूक महिलांनी आपल्या हक्कांसाठी न हटता, "बिल्डर हटाव - कोळी बचाव"! अशा घोषणा देत गावातील नारी शक्तिने मोर्चा काढला. मसान देवीच्या मंदिरात आरती केल्यावर जवळच असलेल्या वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटीची जागा बचावसाठी येथील कोळी महिलांनी येथे ठिय्या आंदोलन केले.
या संस्थेची एकूण ६१% म्हणजेच २६७४५ चौ. मी. = २८७८८० चौ.फूट जागा बिल्डरला देण्यास येथील नारी शक्तिचा विरोध आहे. महत्वाचे म्हणजे, ही जमीन शासनमान्य आहे. या जागेचे एकूण क्षेत्रफळ 473957 चौ. फूट इतके आहे.यापैकी फक्त 39 टक्के जागा ही येथील कोळी समाजाच्या विकास प्रकल्पासाठी मिळणार आहे का म्हणून ६१% जागा व्यावसायिकास (बिल्डरला) द्यावी याला येथील नारी शक्तिचा कडाडून विरोध आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वेसावे गावातील रणरागिणी सारिका साठी, आशा झेमणे, शारदा पाटील, देवयानी भुंनगवले यांनी केले.