मनोहर कुंभेजकर
मुंबई - मनोरीच्या समुद्रात बुडालेला मच्छीमार अखेर सुखरूप सापडला आहे. मत्स्यव्यवसाय व हवामान खात्याने खात्याने हाय अलर्ट जारी केला असताना मनोरी कोळीवाड्यातील मच्छीमार पीटर गरीबा हे मनोरी मार्वे खाडीत मासेमारी करिता गेले होते. सोमवारी (1 जुलै) रात्री 11.00 वाजण्याच्या सुमारास आपली बिगर यांत्रिक नौका (टोनी बोट) घेऊन मासेमारी करिता गेले असता नौका बुडून ते बेपत्ता झाले होते. मात्र बुधवारी ते सुखरुप सापडले आहेत.
बुधवारी (3 जुलै) सकाळी 7.30 ते 8.00 च्या सुमारास भाटी कोळीवाड्यातील मच्छिमार मधूकर (मधू) कोळी यांना खोल समुद्रात वाहत चाललेले पीटर गरीबा दिसले. त्यांनी मढ कोळीवाड्यातील महिंद्रा बाजे यांच्या मशिन असलेल्या नौकेच्या साहाय्याने पीटर गरीबा या मच्छिमारास बाहेर काढून भाटी कोळीवाड्यातील बंदरामध्ये आणून त्यांना वाचविण्यात यश आले. भाटी मच्छिमार सर्वोदय मच्छिमार सहकारी सो. लि. चे अध्यक्ष गणेश कोळी व त्यांच्या ग्रामस्थांनी वैद्यकीय उपचार करून पीटर यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
मनोरीचे मच्छिमार पीटर गरीबा हे सुखरूप मिळाल्याने जीवदान मिळाले अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतशी बोलताना दिली. मात्र हायअलर्ट जारी केला असताना, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त (उपनगरे) संदीप दफ्तरदार यांचे हाय अलर्टमध्ये अशा प्रकारच्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर काही नियंत्रण नाही का? असा सवाल त्यांनी केला.
संदीप दफ्तरदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बिगर यांत्रिकी नौकांना मासेमारी बंदी नसते आणि कायद्याने मत्स्यव्यवसाय खात्याचे त्यांच्यावर नियंत्रण नसते. ते जीव घोक्यात घालून मासेमारी करतात. काही वर्षापूर्वी मनोरी येथील बिगर यांत्रिकी मच्छीमार समुद्रकिनारी मासेमारी करत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला होता अशी माहिती त्यांनी दिली.