Join us

मुंबईतील मच्छिमारांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील मच्छिमारांना आता आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. शेकडो मैल दूर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील मच्छिमारांना आता आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. शेकडो मैल दूर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांनी किती मासे पकडले याची माहिती तत्काळ बंदरावर बसलेल्या व्यापाऱ्यांना समजणार आहे. ‘फिश कॅच रिपोर्ट’ असे या उपग्रह-आधारित तंत्रज्ञानाचे नाव आहे. नॅरोबँड-आयओटी नेटवर्कचा वापर करून ते विकसित करण्यात आले आहे.

मच्छिमारांचा व्यवसाय वाढावा, मासे वेळेत विक्रीसाठी उपलब्ध व्हावे या उद्देशाने बीएसएनएल आणि स्कायलोने त्याची निर्मिती केली आहे. समुद्रात शेकडो नॉटिकल मैलावर असणारे मच्छिमार पकडलेल्या माशांचा तपशील फिश कॅच रिपोर्टद्वारे सहजपणे बंदरावर असलेल्या सहकाऱ्यांपर्यंत पाठवू शकतात. मासे किती मिळाले, किती वेळात ते पोहोचतील, याची माहिती मिळाल्याने जहाज बंदरावर दाखल होताच ग्राहक ताजे मासे खरेदी करू शकतील. यामुळे मच्छिमारांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याची माहिती स्कायलोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगिरा अग्रवाल यांनी दिली.

मत्स्य व्यवसाय कार्यक्रमाचे संचालक गणेश नाखवा यांनी सांगितले की, सीफूड निर्यातीत लक्षणीय वाढ होत असल्याने, अशा तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे. ही उपकरणे संपूर्ण पुरवठा साखळीच्या शाश्वत विकासासाठी उपयोगी ठरतील.

..........

असा होईल वापर...

स्वदेशात निर्मित केलेले हे तंत्र बीएसएनएलच्या उपग्रह-जमीन पायाभूत सुविधांशी जोडले जाईल आणि भारतीय समुद्रांसह संपूर्ण देशभरात त्याची व्याप्ती असेल. म्हणजे काश्मीर ते लडाख, कन्याकुमारी ते गुजरात आणि ईशान्य सीमेपर्यंत याचा वापर करता येईल. स्कायलोने तयार केलेले हे उपकरण केवळ सरकारी यंत्रणांना वापरता येईल.