मुंबईसह राज्यातील बंदरावर काळे बावटे दाखवत मच्छिमारांनी केंद्र शासन अन् ओएनजीसी कंपनीचा केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 02:01 PM2020-06-01T14:01:38+5:302020-06-01T15:17:48+5:30
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली कफ परेड मछिमार नगरच्या बंदरातील जेट्टी वर मच्छिमारांनी हातात काळे बावटे घेऊन जोरदार निदर्शने केली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: मासेमारीचा कालावधी ६१ दिवसांवरून ४७ दिवसांचा करून १ जून ते १५ जून पर्यंत खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देणाऱ्या केंद्र शासनाचा व ओएनजीसी कंपनीने अजून मच्छिमारांना ५०० कोटींची नुकसान भरपाई दिली नसल्याबद्धल आज सकाळी राज्यातील विविध मासेमारी बंदरावर काळे झेंडे दाखवून मच्छिमारांनी जोरदार निदर्शने केली. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष व जेष्ठ मच्छिमार नेते दामोदर तांडेल यांनी या आंदोलनाची हाक दिली होती.
येत्या चार तारखेला समुद्रात मोठे वादळ धडकणार आहे.त्यामुळे माश्यांचे उत्पादन संपुष्टात येईल .तुफानात बोटी बुडल्या तर मछिमारही जिवाला मुकतील .त्यामुळे सदर आदेश रद्द करण्यासाठी व ओएनजीसी कंपनीने मच्छिमारांना ५०० कोटींची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आज सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत विविध मासेमारी बंदरावर मच्छिमारांनी काळे झेंडे दाखवून केंद्रीय कृषिमंत्री गिरिराज सिंग व ओएनजीसी कंपनीचा निषेध केला अशी माहिती दामोदर तांडेल यांनी दिली.
सर्वप्रथम लोकमत ऑनलाईन व लोकमतमध्ये सदर वृत्त प्रसिद्ध केले होते. राज्यातील ७२० किमी सागरी किनारपट्टीवर तसेच सोशल मीडियावर लोकमतचे वृत्त व्हायरल झाले होते. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली कफ परेड मछिमार नगरच्या बंदरातील जेट्टी वर मच्छिमारांनी हातात काळे बावटे घेऊन जोरदार निदर्शने केली.
राज्यात मासेमारीत प्रसिद्ध असलेल्या वेसावे बंदरावर मच्छिमार नेते प्रदीप टपके, पृथ्वीराज चंदी, पराग भावे , नारायण कोळी, देवेंद्र काळे, नंदकुमार भावे, नचिकेत जांगले, संदीप भानजी, जगदीश मुंडे यांच्यासह येथील सुमारे २०० मच्छिमारांनी हातात काळे बावटे फडकवत केंद्र सरकार व ओएनजीसी कंपनीचा जोरदार निषेध केला. सदर आदेश रद्द करा व ओएनजीसी कंपनीने मच्छिमारांना ५०० कोटींची नुकसान भरपाई दिलीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी येथील मच्छिमारांनी केली अशी माहिती प्रदीप टपके यांनी दिली.
दामोदर तांडेल यांनी लोकमतला सांगितले की,देशात पूर्व किनाऱ्यावर व पश्चिम किनाऱ्यावर पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वेगळा आहे. पूर्व किनाऱ्यावर कन्याकुमारी ते पश्चिम बंगाल पर्यंत १५ एप्रिल ते ३१ मे २०२० पर्यंत व पश्चिम किनाऱ्यावर कन्याकुमारी ते गुजरात पर्यंत १५ जून ते ३१ जुलै २०२० पर्यंत मासेमारी बंदी कालावधी ४७ दिवसांचा करण्यात आला आहे.
केंद्र सरकारचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ.संजय पांडे यांनी दि. २५ मे रोजी सदर नवीन आदेश जारी केला आहे. दि. २० मार्च २०२० रोजी काढलेल्या आदेशात पूर्व किनारपट्टी दि. १ एप्रिल ते ३१ जून २०२० व पश्चिम अरबी समुद्रासाठी दि. १ जून ते ३१ जुलै २०२० असा होता. तो रद्द करून नवीन आदेशात ६१ दिवसांऐवजी आता ४७ दिवस मासेमारी पावसाळी बंदीचा कालावधी ठरविण्यात आला आहे. कोरोना मुळे मासेमारी बंदीचे नुकसान मच्छिमारांचे झाले आहे. त्याची भरपाई करण्यासाठी १२ नॉटिकल ते २०० सागरी मैल या केंद्र शासनाच्या विशाल क्षेत्रात (ई.ई.झेड) मध्ये मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ओएनजीसी कंपनी सुमुद्रात साईस्मिक सर्वेक्षण करतांना मच्छिमारांना मासेमारी व्यवसाय बंद करावा लागतो. सन २००५ साला पासून ते २०२० पर्यंत मंत्रालयात अनेक बैठका घेतल्या होत्या. ओएनजीसी कंपनी नफ्यामधून दोन टक्के निधी मछिमारांसाठी राखीव ठेवत आहे. सन २००५ पासून ते २०२० पर्यंत ५०० कोटी रुपयांची भरपाई बाकी आहे. प्रत्येक मच्छिमाराला एक लाख रुपये व बोट मालकांना सहा सिलिंडर इंजिन असेल तर सहा लाख रुपये व तीन सिलिंडर इंजिन असेल तर तीन लाख रुपये भरपाई मिळणे अजून बाकी आहे. तर आज पासून ओएनजीसी समुद्रात साईस्मिक सर्वेक्षण चालू करीत असल्याचे दामोदर तांडेल यांनी शेवटी सांगितले.