दर्याराजा सांभाळ कर, व्यवसायाला भरभराट दे, नारळी पौर्णिमेसाठी कोळीवाडे झाले सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 02:56 AM2019-08-14T02:56:32+5:302019-08-14T06:59:45+5:30

अंधेरी तालुक्यातील वेसावे कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा अगदी पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली जाते. या सणाच्या आगमनाची तयारीदेखील जोरदार असते, कारण वेसाव्यातील प्रत्येक कोळी बांधव या सोन्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

Fishermen ready for Narali purnima in Mumbai | दर्याराजा सांभाळ कर, व्यवसायाला भरभराट दे, नारळी पौर्णिमेसाठी कोळीवाडे झाले सज्ज

दर्याराजा सांभाळ कर, व्यवसायाला भरभराट दे, नारळी पौर्णिमेसाठी कोळीवाडे झाले सज्ज

Next

- मनोहर कुंभेजकर
मुंबई   - अंधेरी तालुक्यातील वेसावे कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा अगदी पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली जाते. या सणाच्या आगमनाची तयारीदेखील जोरदार असते, कारण वेसाव्यातील प्रत्येक कोळी बांधव या सोन्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. मासेमारीच्या होड्यांची रंगरंगोटी, झेंडे-पताक्यांची   बहारदार सजावट व महिलांनी तयार केलेल्या चवदार नारळाच्या करंज्या हे कोळीवाड्यातील मुख्य आकर्षण असते.

उद्या साजऱ्या होणाºया नारळी पौर्णिमेसाठी कोळीवाडे सज्ज झाले आहेत. राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्याच्या आदेशाप्रमाणे १ जून ते ३१ जुलै असा मासेमारी बंदीचा कालावधी असतो. उद्याच्या नारळी पौर्णिमेला वेसावे, वरळी, धारावी, माहुल, माहीम, खारदांडा, जुहू, मढ, भाटी, मालवणी, मनोरी व गोराई हे मुंबईतील विविध कोळीवाडे सज्ज झाले आहेत.

पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी केल्यानंतर आणि सायंकाळी दर्याला सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करून आणि बोटींची पूजा केल्यानंतर खºया अर्थाने मासेमारी बंदीच्या काळात वेसावे समुद्रकिनारी शाकारलेल्या बोटी मासेमारीला जातील, अशी माहिती वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे व सरचिटणीस पराग भावे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

वेसाव्यात ९ प्रमुख गल्ल्या वाजतगाजत मानाचा सोन्याचा नारळ घेऊन कोळी बॅण्डबाजासकट मिरवणुकीत सहभागी होतात. काही जण तर पारंपरिक कोळी पेहरावात सज्ज होऊन मिरवणुकीचा आनंद द्विगुणाने वाढवतात. सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करण्याचा मान गल्लीतील अध्यक्षाला असतो. नारळ मिरवणूक बंदरावर पोहोचली की सर्व जण नारळाची व दर्या सागराची आरती ओवाळतात व शांत होऊन मासेमारी व्यवसायाला यश मिळण्यासाठी कोळी महिला सागराला साकडे घालतात. विशेष म्हणजे वेसावे गावात सागराला शहाळीचा असोल नारळ अर्पण केला जातो. सोन्याच्या नारळाबरोबरच घरोघरचे सदस्य आपल्या कुटुंबाचा नारळ घेऊन मिरवणुकीत सहभागी होतो, अशी माहिती कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके व प्रवीण भावे यांनी दिली.
या वर्षी वेसाव्यातील तेरेकर तरुण मंडळ येथील वार्षिक दहीहंडी उत्सवाचा मानकरी असल्याकारणाने या नारळी पौर्णिमेची येथील मसान देवी मंदिरातून उद्या संध्याकाळी ५ वाजता पारंपरिक वेशात भव्य मिरवणूक निघणार आहे, अशी माहिती तेरेकर तरुण मंडळाचे अध्यक्ष संदेश शिपे व जितेंद्र बोले यांनी दिली.

वेसावे गावात आणखी एक जुनी परंपरा आहे. नारळी पौर्णिमा झाल्यानंतर दुसºया दिवसापासून गावातील राम मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते़ यात गावातील विविध गल्ल्यांचा सहभाग असतो. या सप्ताहाची सांगता दहीहंडीच्या दिवशी होते. येथील राम मंदिर परिसरात बांधलेली मानाची हंडी अणुकुचीदार भाल्याने फोडण्याचा मान यंदा तेरेकर तरुण मंडळाचे अध्यक्ष संदेश शिपे यांना मिळणार आहे.

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेची लगबग एक महिना आधी सुरू होते. येथे हाताने नारळ फोडण्याच्या स्पर्धा चांगल्याच रंगतात. सुमारे एक महिनाभर चालत असलेल्या या नारळ फोडण्याच्या स्पर्धेत हजारो नारळ फुटतात. ज्याच्या हातातील नारळ फुटेल त्याच्या प्रतिस्पर्ध्याला नारळ मिळतो़, अशी माहिती माणिक धर्मा पाटील जमातीचे अध्यक्ष व मच्छीमार नेते विजय वरळीकर यांनी दिली.

येथील नारळी पौर्णिमेच्या कै. माणिक धर्मा पाटील जमात ट्रस्टच्या सजवलेल्या होडीवरून आणि हिरा कापर जमातीच्या सजवलेल्या पालखीतून संध्याकाळी भव्य मिरवणुका काढण्यात येतात.

मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून यंदा चांगली मासळी मिळू दे, आमच्या कुटुंबाचे वादळ-वा-यापासून रक्षण कर, अतिरेकी हल्ल्यावर लक्ष ठेवून आमच्या भारमातेचे रक्षण कर, असे मनोभावे गा-हाणे सागर देवतेला घातले जाते.

वरळी कोळीवाड्यातील बतेरी या जागी समुद्राला सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करण्याचा मान हा माणिक धर्मा पाटील जमातीचे अध्यक्ष विजय वरळीकर आणि कै. हिरा कापर जमातीचे अध्यक्ष देवेंद्र कासकर यांना मिळाला आहे.

Web Title: Fishermen ready for Narali purnima in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.