वरळी कोळीवाड्यातील कोस्टल रोडचे काम मच्छिमारांनी पुन्हा बंद पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 01:12 AM2021-12-22T01:12:31+5:302021-12-22T01:14:38+5:30
आजही येथे जाळ्यात मासळी मिळाली,कोस्टल रोडमुळे आमचे जीवन उध्वस्त होणार असून आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा सवालही त्यांनी केला.
मुंबई- वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम मंगळवारी पुन्हा बंद पाडले.आज सकाळी सात वाजल्यापासून कोळी महिला व येथील मच्छिमार क्लिव्हलँड बंदरात जमले होते. तर येथील मच्छिमारांच्या २५ ते ३० बोटी कोस्टल रोडचे काम बंद पाडण्यासाठी आत समुद्रात तैनात होत्या.
वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी व त्यांचे एक बोटभर पोलिसांच्या संरक्षणात आज सकाळी १०.३० च्या सुमारास कोस्टल रोडच्या वरळी डेअरी जेट्टी जवळ कंत्राटदाराच्या टग बोटीने ओढत जेकब( काम करण्यासाठी फ्लोटिंग जेट्टी) घटनास्थळी आले. यावेळी पोलीस, कंत्राटदार व स्थानिक मच्छिमार आमने सामने आले. समुद्रात हा सिलसीला दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होता. अखेर कंत्राटदार व पोलीस मग परत गेले, अशी माहिती येथील मच्छिमारांनी दिली. तुम्ही येथील कोस्टल रोडच्या कामाला विरोध करू नका,तुमची जाळी हटवा, पाच पिलरमध्ये काम करू द्या, अशी विनंती पोलीस व पालिकेचे अधिकारी आम्हाला करत होते. काल वरळी पोलीस ठाण्याने नितेश पाटील, विजय पाटील, रॉयल पाटील,जॉन्सन कोळी यांना नोटीसा पाठवून कोरोनात जमावबंदी केल्यास तुमच्यावर १४४ कलम अन्वये कारवाई करू अशी नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितले.
आज सायंकाळपर्यंत तुम्ही येथील कोस्टल रोडचे काम करू देणार की नाही, याप्रकरणी तुमची भूमिका स्पष्ट करा,अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती नितेश पाटील व विजय पाटील यांनी लोकमतला दिली.
मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि आमची मच्छिमारांची बैठक होऊन बोटी जाण्यासाठी दोन पिलरमधील अंतर ६० मीटर वरून २०० मीटर होत नाही आणि तसे आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथील कोस्टल रोडचे काम आम्ही होवू देणार नाही, असा पवित्रा घेतल्याचे वरळी कोळवाडा नाखवा मत्स्यव्यवसाय सहकारी सोसायटी लिमिटेडचे सचिव नितेश पाटील व अध्यक्ष विजय पाटील यांनी पोलीस व कंत्राटदारांना सांगितले.
मच्छिमारांच्या एकही मागणी मान्य न करता कंत्राटदाराला मदत करण्यासाठी स्थानिक पोलीस आम्हाला दमदाटी करतात आणि मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप संकेत कोळी यांनी केला.आजही येथे जाळ्यात मासळी मिळाली,कोस्टल रोडमुळे आमचे जीवन उध्वस्त होणार असून आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा सवालही त्यांनी केला.